Maharashtra Politics : "संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात", मंत्रिपद न मिळाल्याने प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंवर नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 08:49 IST2024-12-16T08:48:24+5:302024-12-16T08:49:29+5:30
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली.

Maharashtra Politics : "संघर्ष करणं हेच माझ्या नशिबात", मंत्रिपद न मिळाल्याने प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंवर नाराज?
Maharashtra Politics ( Marathi News ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. मंत्रिपदासाठी अनेक नेते इच्छुक होते. शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे मंत्रिपदासाठी इच्छुक होते, पण सर्वे यांना मंत्रिपद मिळालेले नाही. यामुळे आता सुर्वे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यांनी माध्यमांसोबत बोलताना नाराजी व्यक्तही केली आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले, मी एक सामान्य घरातील आहे. आम्ही संघर्ष करुन इथंपर्यंत आलो आहे. मी काम करुन कॉलेज पूर्ण केले आहे. संघर्ष माझ्या पाचवीला पूजला आहे. मंत्रिपदासाठी माझा विचार एकनाथ शिंदे यांनी केला असेल पण अनेकजण इच्छुक होते. त्यात काहीजण आजी, माजी आहेत. काही मातब्बरांची मुल आहेत. मी साधा गरीब घरातील आहे, यावरुन माझ्या जीवनात संघर्ष आहे हे निश्चित सिद्ध झाले आहे, असं सांगत आमदार प्रकाश सुर्वे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
"ते मोठे नेते आहेत, त्यांनी विचार करुनच निर्णय घेतला असेल. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो होतो तेव्हा मुंबईतील पहिला आमदार मी होतो. तेव्हा माझ्या घरावर हल्ला झाला होता. त्यांनी माझी मोठी बदनामी केली होती. मी आता पुन्हा एकदा चांगल्या मतांनी विजयी झालो आहे, असंही सुर्वे म्हणाले. साहेबांनी मला संधी दिली असती तर मी त्या संधीचं सोनं केलं असतं. लोकसभेलाही आम्ही चांगले लीड घेतले आहे, असंही सुर्वे म्हणाले.
नाराजीमुळे कोणता मोठा निर्णय घेणार का? या प्रश्नावर बोलताना प्रकाश सुर्वे म्हणाले, शिंदे साहेब ठरवतील तो निर्णय घेऊ. त्यांच्यासोबत होतो आहोत. त्यांनी आता न्याय द्यायचा का ते ठरवायचं आहे, असंही प्रकाश सुर्वे म्हणाले.
काल शिवसेनेतील ११ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या पक्षाला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत.
कॅबिनेट मंत्री
1) शंभुराज देसाई
2) उदय सामंत
3) दादा भुसे
4) गुलाबराव पाटील
5) संजय राठोड
6) संजय शिरसाट
7) प्रताप सरनाईक
8) भरत गोगावले
9) प्रकाश आबिटकर
राज्यमंत्री
10) आशिष जयस्वाल
11) योगेश कदम