Maharashtra Politics : महायुतीत फूट? राष्ट्रीय समाज पक्षाचा स्वबळाचा नारा, महादेव जानकर स्पष्टच बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 02:15 PM2023-03-19T14:15:30+5:302023-03-19T14:16:23+5:30
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर रासप नेते महादेव जानकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी आहे. पण, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bwankule) यांनी केलेल्या एका विधानामुळे महायुतीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी विधानसभेला 288 पैकी भाजप 240 तर शिवसेना (शिंदे गट) 48 जागा लढेल, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातून आक्रमक प्रतिक्रिया आल्या. तसेच, भाजपचा विश्वासू मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
लोकसभाही स्वबळावर लढू
माध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, 'भाजपने जागा वाटप जाहीर केले आहे, त्यात आमचा विचार केलेला नाही. शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढणार असल्याचे दिसत आहे. आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा नसेल तर, आम्हीही त्यांच्या मागे लागणार नाहीत. आमच्या ताकदीवर 48 लोकसभा निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. सोबत घेतले तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू,' अशी स्पष्टोक्ती जानकर यांनी केली.
आमही अनेक ठिकाणी ताकत
ते पुढे म्हणतात, 'आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. आम्ही सध्या दोन आमदार आहोत. मी वरच्या सभागृहात आहे तर दुसरा खालच्या सभागृहात आहे. आमच्याकडे 98 जिल्हा परिषदा आहेत, तर तीन सभापतीदेखील आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक-एक जिल्हा परिषद सदस्य आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला टेक्निकली मान्यता मिळाली आहे. जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहे,' असंही ते यावेळी म्हणाले.
भाजपकडे लोकसभेचा प्रस्ताव
भाजपाकडे आम्ही लोकसभेच्या पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. जिथे आमची लढण्याची औकात आहे, तिथेच जागाच मागत आहोत. तो प्रस्ताव मान्य नसेल आणि त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचे ठरवले असेल, तर त्यांना शुभेच्छा आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला सोबत घेतील, अन्यथा आम्हाला आमचा रस्ता मोकळा आहे,' असंही जानकर यावेळी म्हणाले. त्यामुळे बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटापोसब इतर मित्रपक्षही नाराज असल्याचे दिसत आहे.