Maharashtra Politics : ईव्हीएम प्रकरणी सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका, युगेंद्र पवारांना फेरमतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 11:53 IST2024-12-26T11:51:51+5:302024-12-26T11:53:49+5:30
Maharashtra Politics : युगेंद्र पवार यांनी फेर मतमोजणीचा अर्ज मागे घेतला आहे.

Maharashtra Politics : ईव्हीएम प्रकरणी सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका, युगेंद्र पवारांना फेरमतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला सांगितला
Maharashtra Politics ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या निकालावरुन विरोधकांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्यातील अनेक उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी केली होती. याबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आरोप केले होते. दरम्यान, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याउलट भूमिका घेतल्याचे दिसत आहे. 'आपण ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला दोष देणार नाही', अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे युगेंद्र पवार यांना फेर मतमोजणीचा अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले.
काल पुण्यात पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, युगेंद्र पवार यांना तो अर्ज मागे घेण्यासाठी मीच सांगितलं. मला असं वाटत होत की, बाकीच्या बऱ्याच जणांनी हे केलं आहे. बाकीच्या ठिकाणची माहिती घेत आहे. गडबड अशी काही नाही, युगेंद्रचा हा पहिलाच अनुभव आहे. वयानेही तो लहान आहे, मोठा संघर्ष त्याने अेक महिने केला आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचे ठोस पुरावे हाती आल्याशिवाय त्याबाबत मी दोष देणे योग्य नाही. मी याच ईव्हीएमवर चार निवडणुका जिंकली आहे. ई्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे, या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता. यात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांनीही संशय व्यक्त केला होता. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या उलट भूमिका घेतल्याने राजकीय चर्चा सुरू आहेत.
युगेंद्र पवारांनी फेर मतमोजणीचा अर्ज घेतला मागे
युगेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी फेर मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दिला होता. हा अर्ज त्यांनी पाठिमागे घेतला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.