Maharashtra POlitics: अशी कमी होणार महाराष्ट्रातली राजकीय कटुता

By अतुल कुलकर्णी | Published: November 13, 2022 01:35 PM2022-11-13T13:35:16+5:302022-11-13T13:36:28+5:30

Maharashtra Politics: महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत म्हणाले. लगेचच दोन्ही बाजूंनी त्यासाठी जोरदार नियोजन करण्यात आलंय.

Maharashtra Politics: This will reduce political bitterness in Maharashtra | Maharashtra POlitics: अशी कमी होणार महाराष्ट्रातली राजकीय कटुता

Maharashtra POlitics: अशी कमी होणार महाराष्ट्रातली राजकीय कटुता

Next

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 
आमच्या लाडक्या सौभाग्यवती,
मुद्दाम तुम्हाला हे पत्र लिहित आहे. मी आता दोन-चार दिवस फार बिझी राहीन. अचानक खूप काम आले आहे. महाराष्ट्रात राजकीय नेत्यांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत म्हणाले. लगेचच दोन्ही बाजूंनी त्यासाठी जोरदार नियोजन करण्यात आलंय. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यात कटुता कमी करण्यासाठी नेमकं काय ठरलं याचा मास्टर प्लॅन मला मिळाला आहे...! उ. बा. ठा. शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तसाच प्लॅन बनवल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे; मात्र त्याला अजून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यातली कटुता अजून संपली की नाही तेही मला पाहायचं आहे. त्यामुळे घरचा किराणा, भाजी महाग झाली, पेट्रोल महागलं, असल्या छोट्या प्रश्नांत मला वेळ नाही. गावाकडे पावसामुळे पिकांचं नुकसान झालं हे मला आता सांगत बसू नकोस. दरवर्षीच ते होतं. मंत्री, संत्रीच जर त्याकडे लक्ष देत नाहीत तर आपण तरी कशाला लक्ष द्यायचं..? मला खूप कामं आहेत. त्यातच हे नवीन काम आलं आहे. तेव्हा घरच्या फालतू विषयांमध्ये मला वेळ नाही. तू काय ते बघून घेशील..! नाहीतरी तुला काय काम आहे...?
तुम्हाला सांगतो बबन्याची आई, खूप मोठं नियोजन सुरू आहे. संजय राऊत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जातील, तेव्हा ते सोबत कोकणातल्या हापूस आंब्याचं खोकं नेणार आहेत. फडणवीसदेखील त्यांना भेटीदाखल नागपूरच्या संत्र्यांचं खोकं देणार आहेत. त्यामुळे मला खोके आणायला जायचं आहे. संत्र्यांचे खोके मुलुंडपर्यंत नीट येण्यासाठी राऊतांनी दोन गाड्या सांगितल्या आहेत. जितेंद्र आव्हाडांमुळे ‘हर हर महादेव’ सिनेमा आता हाऊसफुल्ल चालू लागला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्याकडे काजूकतलीचे खोके पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मध्येच माशी कुठे शिंकली हे तपासायचं आहे, कारण त्यांना पोलिसांनी अटक केली होती.... 
राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे सगळे नेते यात्रेत गेले. आता शिवसेनेचे नेते जाणार आहेत. त्यांच्यातली कटुता मिटली आहे; मात्र बाळासाहेब थोरात, दोन चव्हाण, नाना पटोले, भाई जगताप यांनी कसोशीने त्यांच्यातली कटुता राहुल गांधींना कळू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्यातली कटुता मिटावी म्हणून स्वतः शरद पवार यांनी दोन्ही चव्हाणांना वेगवेगळे बोलावून चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याचे ठरवले आहे. त्यावरूनही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार कोणत्या चव्हाणांना आधी बोलावतात आणि कोणाला नंतर..? यासाठी बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आपापले दूत माहिती काढायसाठी कामाला लावले आहेत. 
सगळा नुसता गुंता होऊन बसला आहे. तरीपण कटुता संपवावी लागेल, म्हणून आता एकनाथ शिंदे यांनी उ. बा. ठा. शिवसेनेच्या काही आमदारांना वॉशिंग मशीनचे खोके पाठवायची तयारी सुरू केली आहे. नेमके किती खोके आणायचे हेदेखील ठरवायचं आहे. नुसते कपडे धुऊन देणारी आणि धुतलेले कपडे वाळवून देणारी; अशा दोन वॉशिंग मशीन आहेत. कोणाला कोणती वॉशिंग मशीन हवी, त्यानुसार खोके पॅक करावे लागतील. कटुता कमी करायची तर हे सगळं करावं लागेल मंडळी... त्याशिवाय कटुता कशी कमी होणार..? एकदा का कटुता मिटली की फडणवीस, राऊत, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील सगळे मिळून एकाच बसमधून अयोध्येला जायचं ठरलं आहे. त्यामुळे त्याचीही मला तयारी करायची आहे. मंडळी, डोळ्यासमोर चित्र उभं करा... हे सगळे लोक एकाच बसमध्ये बसून अयोध्येला निघाले आहेत...! किती धमाल चित्र असेल ते...! महाराष्ट्र या एकाच घटनेने एकदम सुजलाम् सुफलाम् होईल...! चार उद्योग महाराष्ट्रातून गेले काय, आणि दहा नोकऱ्या कमी मिळाल्या काय... काही फरक पडणार नाही. कटुता कमी होणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मला माझं काम करू द्या..! डिस्टर्ब करू नका... तुम्ही घरचं बघून घ्या, दारचं मला बघू द्या...!
- तुमचाच बाबूराव

Web Title: Maharashtra Politics: This will reduce political bitterness in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.