जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 08:14 PM2023-06-13T20:14:15+5:302023-06-13T20:15:10+5:30
Maharashtra Politics: राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, अशी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे.
Maharashtra Politics: राज्यातील काही वृत्तपत्रांमध्ये आज छापून आलेल्या शिवसेनेच्या(शिंदे गट) जाहिरातीने मोठ गोंधळ उडाला आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, असा उल्लेख करण्यात आला आहे. या जाहिरातीमुळे राज्यात राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातीवर आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना शंभूराज देसाई म्हणाले की, 'आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाशी काहीही संबध नाही. सर्वे कुणी केला आणि जाहिरात कुणी छापून आणली, हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या हितचिंतकाने दिली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदु्वाच्या मुद्यावर केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. चांगली गोष्ट आहे की, मुख्यमंत्री पदासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर युतीचेच नेते आहेत,' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली.
'30 वर्षात अशी जाहिरात कधी पाहिली नाही'
या जाहिरातीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणले की, 'गेल्या 30 वर्षात अशी जाहिरात आजपर्यंत कधी आपण पाहिली नाही. एवढे लोकप्रिय आहात तर निवडणुका का टाळता? फडणवीसांपेक्षा शिंदे लोकप्रिय आहेत, हे भाजपाला मान्य आहे का? असा सवाल अजित पवार यांनी केला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या जनतेला पुन्हा हेच मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत आहे. हे पाहून आनंद झाला, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. या जाहिरातीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा ऐकायला आवडेल, अशी मिश्किल टिप्पणीही अजित पवारांनी केली.