राज्य शासनाच्या सीटी स्कॅन दरनिश्चिती विरोधात 'महाराष्ट्र रेडिओलॉजी' संघटना न्यायालयात जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 07:31 PM2020-09-26T19:31:57+5:302020-09-26T19:36:27+5:30
सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या सीटी स्कॅनसाठी अतिरिक्त उपाययोजनांचा खर्च वाढल्याने निश्चित केलेले दर न परवडणारे आहेत,
पुणे : छातीच्या सीटी स्कॅन चाचणीच्या राज्य शासनाने निश्चित केलेल्या दोन ते तीन हजार रुपये दराविरोधात महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशन उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सद्यस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या सीटी स्कॅनसाठी अतिरिक्त उपाययोजनांचा खर्च वाढल्याने निश्चित केलेले दर न परवडणारे आहेत, त्यामुळे या दरनिश्चितीला स्थगिती देण्याची मागणी असोसिएशनकडून केली जाणार आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे सीटी स्कॅनची मागणीही वाढली आहे. कोरोनानंतर फुफ्फुसामध्ये विषाणु संसर्ग होऊन न्युमोनिया होत आहे. काही वेळा एक्स-रेमधून छातीतील संसर्ग दिसत नाही. फुप्फुसाला किती आणि कोणत्या ठिकाणी संसर्ग झाला आहे, याचे निदान सीटी स्कॅन चाचणीत अचूक होत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून या चाचणीला प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांना त्यासाठी पाच ते दहा रुपये मोजावे लागत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत होत्या. त्यानुसार शासनाने अडीच हजार रुपये दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाविरोधात रेडिओलॉजी तंत्रज्ञांमध्ये नाराजीचा सुर आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप कवठाळे म्हणाले, कोरोना संशयित किंवा रुग्णांचे सीटी स्कॅन करायचे असल्यास त्यासाठी पीपीई कीट, मास्क तसेच सॅनिटायझेशनचा खर्च वाढला आहे. तंत्रज्ञ व अन्य कर्मचारीही वाढीव वेतन मागतात. तरीही आम्ही मागील वर्षीच्या दराप्रमाणे सीटी स्कॅनचे शुल्क घेत होतो. राज्यात सुमारे ४ ते ६ हजारपर्यंत शुल्क आकारले जाते. आम्ही ३ ते ५ हजार शुल्क निश्चित करण्याची विनंती केली होती. पण शासनाने परस्पर दर निश्चित केले. हे दर न परवडणारे असल्याने याविरोधात सोमवारी उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे.
-----------------------
पुण्यामध्ये सीटी स्कॅनसाठी सरासरी ४ ते ७ हजार रुपये शुल्क आकारले जाते. रुग्णालय व मशीननुसार हे दर बदलत असतात. कोरोनामुळे सीटी स्कॅनची मागणी वाढली आहे. सीटी स्कॅन मशीनची एकत्रित नोंद होत नसल्याने शहरातील निश्चित आकडा सांगता येणार नाही.
- डॉ. राजलक्ष्मी देवकर, अध्यक्ष, पुणे शहर रेडिओलॉजी असोसिएशन,