Maharashtra Rain Live Updates : मुंबईतील पाऊस ओसरला, जनजीवन सुरळीत, शाळा नियमितपणे सुरू राहतील, मनपाने दिली माहिती

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 11:17 AM2024-07-25T11:17:42+5:302024-07-25T11:18:53+5:30

 Maharashtra Rain Live Updates: गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार  पाऊस  सुरू आहे. पुण्यातही पहाटेपासून मुसळधार  पाऊस  सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, ...

Maharashtra Rain Live Updates pune flood situation, heavy rains in mumbai, thane, kolhapur any different parts of maharashtra live updates of rain | Maharashtra Rain Live Updates : मुंबईतील पाऊस ओसरला, जनजीवन सुरळीत, शाळा नियमितपणे सुरू राहतील, मनपाने दिली माहिती

Maharashtra Rain Live Updates : मुंबईतील पाऊस ओसरला, जनजीवन सुरळीत, शाळा नियमितपणे सुरू राहतील, मनपाने दिली माहिती

 Maharashtra Rain Live Updates: गेल्या दोन दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यातही पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आहे. यामुळे नदीच्या बाजूला असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणातील पाणी पातळीही वाढली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. तर दुसरीकडे चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  

LIVE

Get Latest Updates

25 Jul, 24 : 11:43 PM

कोल्हापूरमध्ये आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा, त्यामुळे शाळांना सुट्टी

 भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज २६ व उदया २७ जुलै २०२४ रोजी जिल्ह्याला अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचमुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत उपस्थित रहावयाचे असून आपत्कालीन कामकाज करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.

25 Jul, 24 : 11:17 PM

मुंबईतील पाऊस ओसरला, जनजीवन सुरळीत, शाळा नियमितपणे सुरू राहतील, मनपाने दिली माहिती

25 Jul, 24 : 11:07 PM

राज्यातील पूरस्थिती आणि धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट, दिली महत्त्वाची माहिती

25 Jul, 24 : 09:43 PM

गारगोटी-कोल्हापूर महामार्ग अखेर सर्व वाहनांना बंद

वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी गारगोटी कोल्हापूर महामार्गावरून वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

25 Jul, 24 : 08:54 PM

नवी मुंबईत सुद्धा शाळांना सुटी

हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

25 Jul, 24 : 08:54 PM

ठाणे, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

25 Jul, 24 : 08:40 PM

अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला

कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अलमट्टी धरणातील निसर्ग ७५ हजार क्युसेक्सने वाढवण्यात आला आहे. आता अलमट्टी धरणातून ३ लाख क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.  

25 Jul, 24 : 08:21 PM

उद्या ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी 

भारतीय हवामान खात्याने उद्या देखील दिलेल्या अति मुसळधार पावसाच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या पदाचा वापर करून उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

25 Jul, 24 : 08:20 PM

कल्याण-डोंबिवलीतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा राहणार बंद राहणार आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

25 Jul, 24 : 08:18 PM

पुणेकरांना थोडा दिलासा, मागील ३ तासांपासून पाऊस थांबला

मागील ३ तासापासून पुण्यातील पाऊस थांबला आहे. पाऊस थांबल्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत होईल. 

25 Jul, 24 : 07:23 PM

गोदावरी नदी बारा हजार क्यूसेक्सने प्रवाही, कोपरगाव, राहत्यासह मराठवाड्याला दिलासा

कोपरगाव ( जि. अहमदनगर) : शहरासह तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपूरसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न काही अंशी शमणार आहे. सध्या गोदावरी नदी बारा हजार क्युसेक पाण्याने प्रवाही झालेली आहे.

25 Jul, 24 : 07:03 PM

मोरबे धरणावर जलवर्षाव, नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता मिटली!

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावर गुरुवारी जलवर्षाव झाला. सकाळी सात ते सायंकाळी पाच या दहा तासांमध्ये तब्बल १९७ मि. मी. पावसाची नोंद झाली. एका दिवसात पाणीसाठ्यात आठ टक्के वाढ झाली असून, या वर्षीही धरण भरण्याची आशा पल्लवित झाली आहे. पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली आहे.

25 Jul, 24 : 06:52 PM

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाण्यातील शाळांना सुट्टी

ठाणे शहरात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात १८० मि.मी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामानखात्याने रेड ॲलर्ट जाहीर केला होता, त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देवून दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच शुक्रवारी देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश संबंधितांना दिले.
 

25 Jul, 24 : 06:40 PM

कोयनेचे सहा दरवाजे उघडले; १० हजार क्यूसेक विसर्ग

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास ७८ टीएमसीवर साठा झालेला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून १० हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे.

25 Jul, 24 : 06:27 PM

पुण्यात जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस

बुधवारी रात्रीपासून शहरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली. हा जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस ठरला. तर ‘आयएमडी’च्या नोंदीमधील हा उच्चांकी दहावा पाऊस झाला आहे. वारजे येथील एका गोठ्यातील १४ जनावरे या पावसात दगावल्याची दुदैवी घटनाही घडली.
 

25 Jul, 24 : 06:13 PM

ठाण्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

ठाण्यात २४ तासांत १८७ मीमी पाऊस बरसला तर गुरुवारी सकाळ पासून पावसाचा जोर कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते. तर दोन घटनेत दोघे जण जखमी झाले. तर घोडबंदर भागातील मानपाडा, तसेच घोडबंदर रोडवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. 
 

25 Jul, 24 : 05:59 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१४ गर्भवतींना गावातून हलवले

कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने आपली यंत्रणा आणखी सक्रिय केली आहे. आरोग्य विभागाने बाराही तालुक्यांतील संपर्क तुटू शकणाऱ्या गावातील ३१४ गरोदर महिलांना सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हलवले आहे. यामध्ये सर्वाधिक महिला या हातकणंगले तालुक्यातील आहेत.
 

25 Jul, 24 : 05:52 PM

कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी गावात पुराचे पाणी

करवीर तालुक्यातील आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावात पाणी घुसू लागले असून बुधवारी बहुतांशी कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत. उर्वरित पाण्याचा अंदाज बघून हलणार असून आंबेवाडी येथील भाडेकरू आपल्या पाहुण्यांच्या घरी गेले आहेत. तर जनावरे सोनतळीतील छावणीत दाखल झाले आहेत.

25 Jul, 24 : 05:40 PM

भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी

ग्रामीण भागात सकाळपासून पावसाचा जोर वाढवल्यानंतर भिवंडी शहरातील तीनबत्ती,भाजी मार्केट, कल्याण नाका, देवजी नगर,पटेल नगर,तांडेल मोहल्ला,कल्याण नाका,कमला हॉटेल आदी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तीनबत्ती, भाजी मार्केट या ठिकाणी तब्बल दोन फूट पाणी साचल्याने येथील दुकानांमध्ये पाणी शिरले होते. 

25 Jul, 24 : 05:17 PM

मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर


 

25 Jul, 24 : 05:01 PM

पूर परिस्थिती उद्भवलेल्या परिसरात पालकमंत्री अजित पवार दाखल


 

25 Jul, 24 : 04:58 PM

बदलापूर- वांगणी परिसरात साचलं पाणी, उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ
 

25 Jul, 24 : 04:50 PM

मुंबई-पुणे एक्सप्रेस करण्यात आल्या रद्द

२५ जुलै रोजी गाडी क्रमांक १२१२३ सीएसएमटी - पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर २६ जुलै रोजीसाठी गाडी क्रमांक १२१२४  पुणे - सीएसएमटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे

२५ जुलै रोजी मुंबईहून पुण्याला जाणारी गाडी क्रमांक १२१२५ सीएसएमटी - पुणे प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर २६ जुलै रोजी पुण्याहून मुंबईला येणार गाडी क्रमांक १२१२६ पुणे - सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

गुरुवारी पुण्याला जाणारी गाडी क्रमांक १२१२८ पुणे - सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर शुक्रवारी पुण्याहून मुंबईला येणारी गाडी क्रमांक १२१२७ पुणे - सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

25 Jul, 24 : 04:39 PM

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस


 

25 Jul, 24 : 04:31 PM

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद

कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाच्या मच्छिंद्रीपेक्षा दीड ते दोन फुटाने पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुलाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आली आहे. आठ दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील चारही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. 
 

25 Jul, 24 : 04:17 PM

लष्कराचे १०० जवान तैनात

पुण्यातील सिंहगड परिसरातील एकतानगर परिसरात बचावकार्य करण्यात आले आहे. लष्कराचे जवान आणि एनडीआरएफचे पथक त्या ठिकाणी पोहोचले आहेत. पूर परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी तातडीने बचावकार्य केले जाईल त्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे.  लष्कराचे १०० जवान तैनात करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

25 Jul, 24 : 04:13 PM

पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू - अजित पवार

अजित पवारांनी अधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली आहे. त्यांना आताच पाणी सोडण्यास सांगितलं आहे. रात्री उशिरा खडकवासला धरणातून विसर्ग करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. नदीत सोडणारे पाणी कॅनॉलमध्ये  सोडण्यात येईल. खडकवासला धरणातील विसर्ग कमी केला जाणार आहे. ज्या धरणात आणखी पाणी साठवण्याची क्षमता आहे त्या धरणात, कालव्यात पाणी सोडावं अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.

25 Jul, 24 : 04:07 PM

पुण्याला जाणाऱ्या रेल्वे रद्द

25 Jul, 24 : 04:02 PM

वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी दुपारी कण्हेर धरणातून प्रति सेकंद पाच हजार क्युसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. धरणातून सुरू असलेला विसर्ग व जोरदार पावसामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

25 Jul, 24 : 03:47 PM

सांगलीतील कृष्णा नदी काठची स्मशानभूमीत पाणी शिरले

कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्याने नदी काठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले. कृष्णा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीमध्ये पाणी शिरले असून नदीकाठच्या या स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार आता बंद केले जाणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून कुपवाड भागातील स्मशानभूमी मध्ये आता अंत्यसंस्कार प्रक्रिया केले जाणार असल्याचे सांगली महापालिका प्रशासनाने माहिती दिली.

25 Jul, 24 : 03:30 PM

पाटण जावळी आणि महाबळेश्वर मधील ७०० कुटुंबे स्थलांतरित

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडींना शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. तर  पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातील दरड प्रवण गावातील सुमारे ७०० ते ८०० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येत आहे.  

25 Jul, 24 : 02:58 PM

खडकवासला धरणातून सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेसने पाणी सोडणार

 पुण्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे. संपूर्ण शहरात पावसाने धुमाकूळ घातलाय. काल रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरु आहे. आता पुन्हा पावसाने जोर धरल्याने मुठा नदी पात्रामध्ये सायंकाळी ४ वाजता ३५,५७४ क्यूसेस करण्यात येणार असल्याचे पाठबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

25 Jul, 24 : 02:47 PM

पुण्यात निंबजनगर परिसरात अडकलेल्या ७० जणांची सुटका

पुणे : पुणे शहरात मुसळधार पाऊस पडत असल्याने अग्निशमन विभागाने आज पुणे शहरातील निंबजनगर परिसरात अडकलेल्या ७० जणांची सुटका केली.

25 Jul, 24 : 02:10 PM

पश्चिमेकडे दाणादाण; कण्हेरमधून विसर्ग; कोयनेत ७५ टीएमसी साठा; आता दरवाजे उघडणार

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे दाणादाण उडाली असून दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. तसेच अनेक ठिकाणी रस्ते, पुलावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे वाहतूक बंद झाली आहे. तर सततच्या पावसामुळे काेयना धरणातील पाणीसाठा ७५ टीएमसीवर पोहोचलाय. त्यामुळे दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. कण्हेर धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला तब्बल ३०७ मिलीमीटर झाला आहे.

25 Jul, 24 : 01:23 PM

मुंबईत हाय टाईड, 'गेटवे'च्या समुद्र किनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त

मुंबईत हाय टाईड, 'गेटवे'च्या समुद्र किनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त. 

25 Jul, 24 : 01:23 PM

मुसळधार बसरणार! मुंबईसह रायगड, पालघर, रायगडला एक दिवस रेड अलर्ट; पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी

आज पहाटेपासून मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने आणखी एक अपडेट दिली आहे. आज एक दिवस रेड अलर्ट तर पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

25 Jul, 24 : 01:22 PM

पुण्यातील अनेक नागरिकांच्या घरात घुसले पाणी

पुणे : पानशेत ,खडकवासला, वरसगाव धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे पुण्यातील अनेक नागरिकांच्या घरात घुसले पाणी.

25 Jul, 24 : 01:06 PM

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मोडक-सागर तलाव भरला

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव आज सकाळी १०.४०  वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. यंदाच्‍या मोसमातील भरून वाहू लागलेला मोडक-सागर तलाव हा चौथा तलाव आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे.

25 Jul, 24 : 12:32 PM

रायगड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला आढावा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रोहा, नागोठणे, महाड, खालापूर तालुक्यात पुराचे पाणी बाजारपेठेत घुसले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे हे स्वतः पूर परिस्थितीचा आढावा घेत आहेत. नागोठणे येथे शहरात पुराच्या पाण्यात जाऊन नागरिकांशी संवाद साधून पूरस्थितीची पाहणी केली.

25 Jul, 24 : 12:20 PM

राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले, ७२१२ क्यूसेकने विसर्ग सुरु

कोल्हापूर : मागील चार दिवसापासून कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यानच आज, बुधवारी सकाळी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले. विसर्ग वाढल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होवून महापुराची स्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्र. ३, ४, ६ व ६ उघडले आहेत. यातून ५७१२ क्युसेक व विज निर्मिती केंद्रातून १५०० क्युसेक असा एकूण ७२१२ क्युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.

25 Jul, 24 : 12:04 PM

मुंबईत पहाटेपासून मुसळधार, वाहतुकीवर परिणाम, लोकलसेवा १५ ते २० मिनिट उशीरा

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, यामुळे मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. लोकल रेल्वेवरही याचा परिणाम झाला असून १५ ते २० मिनिट उशीरा धावत आहेत.

25 Jul, 24 : 11:55 AM

वारणा धरणातून विसर्ग वाढणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वारणा धरण परिसरात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे, यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ सुरू आहे. यामुळे आता चालू असलेल्या विसर्गात वाढ करून वारणा धरणातून वीजकेंद्रातून १६५० क्यूसेक व ८८१२ क्युसेक वक्रद्वारे असा एकूण १०४६६ क्युसेक इतका विसर्ग आज २५/०७/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांना तसेच सर्व संबधिताना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

25 Jul, 24 : 11:42 AM

रायगड : हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

रायगड : हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत ८३ टक्के वाढ झाली असून धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर नदी पत्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

25 Jul, 24 : 11:31 AM

पुण्यात कोसळधारा: ३८ ठिकाणी झाडे कोसळली

पुणे शहर आणि परिसरात संततधारेमुळे ३८ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. रात्रभर मुसळधार पाऊस झाला पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. एका पाठोपाठ झाड कोसळण्याच्या घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ उडाली.

25 Jul, 24 : 11:30 AM

पुण्यात कार्यालयांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे शहर आणि जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून अनेक लोक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांना पाचारण केलं असून बोटीही बचाव कार्यात दाखल झाल्या आहेत. तसंच पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

25 Jul, 24 : 11:28 AM

पावसामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

मुंबई: संततधार पावसामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी आणि वाहनांची संथ गती

25 Jul, 24 : 11:27 AM

पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील रस्त्यावर पाणी 

पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे नवी मुंबईतील मार्केटजवळ रस्त्यावर पाणी साचले आहे.

25 Jul, 24 : 11:25 AM

रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळली

रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने ढिगारा हटेपर्यंत या घाट मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली.

25 Jul, 24 : 11:24 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मुख्यालयात जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसानंतर परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांच्याशीही मदत उपाययोजनांबाबत चर्चा केली. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या खडकवासला आणि पिंपरी चिंचवड भागातील बाधितांना आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

25 Jul, 24 : 11:21 AM

लोणावळा शहरात पावसाचा हाहाकार

लोणावळा शहरामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुधवारी (25 जुलै) रोजी 24 तासांमध्ये लोणावळा शहरात विक्रमी 370 मिलिमीटर (14.57 इंच) पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर 145 मिलिमीटर तर रात्रीच्या सुमारास 225 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे व त्या स्वरूपाचा पाऊस देखील लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये मागील 24 तासापासून सुरू आहे. 

25 Jul, 24 : 11:20 AM

मुंबईत पावसामुळे लोकलवर परिणाम

गेल्या ६-७ तासांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मालाड, गोरेगाव, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, कुर्ला आणि घाटकोपर भागात काही प्रमाणात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत रात्रीपासून सुरु असलेल्या तुफान पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. त्यामुळे असाच पाऊस सुरु राहिल्यास रेल्वेची वाहतूक काही प्रमाणात ठप्प होण्याची शक्यता आहे.

25 Jul, 24 : 11:19 AM

मुसळधार पावसामुळे ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर

 हवामान विभागाने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सु्ट्टी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेवरही परिणाम झाल्याचे दिसत आहे. 

Web Title: Maharashtra Rain Live Updates pune flood situation, heavy rains in mumbai, thane, kolhapur any different parts of maharashtra live updates of rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.