Rain Update : आजही जोरदार कोसळणार!'या' जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 08:12 AM2024-07-26T08:12:48+5:302024-07-26T08:14:00+5:30
Rain Update : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे, कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Rain Update : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असून सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक घरं पाण्यात आहेत. दरम्यान, आता काही जिल्ह्यात पुढचे तीन दिवस हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुण्यात पावसाचा कहर; घरांमध्येही शिरले पाणी, पर्यटनस्थळे बंद, चौघे जण दगावले
गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे कोयना, राधानगरी, चांदोली, खडकवासला या धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांचा विसर्ग वाढवण्यात आला असून काही ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अजून काही दिवस असाच पाऊस सुरू राहिला तर महापूराचा धोका आहे.
हवामान विभागाने दिला अलर्ट
हवामान विभागाने काही जिल्ह्यांना आजही रेड अलर्ट दिला आहे, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर , सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यात पावसाचा कहर
पुण्यात काल दिवसभरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे खडकवासला धरणाची पाणी पातळी वाढली, यामुळे विसर्गही वाढवण्यात आला. डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे पहाटे नदीपात्रातील स्टॉल काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ताम्हिणी घाटातील आदरवाडीत दरड कोसळून शिवाजी बहिरट (रा. मुळशी) यांचा मृत्यू झाला असून, जितेंद्र जांभुरपाने (रा. गोंदिया) जखमी झाले आहेत. लवासा सिटी येथे दरड कोसळली असून, त्यात तिघे अडकले. वारजे १५ म्हशी पाण्यात बुडाल्याने मृत्युमुखी पडल्या. मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. सर्वाधिक ५५६ मिमी ताम्हिणी घाटात नोंदला आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे पुढील दोन दिवसांसाठी तातडीने बंद करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ प्रमुख राज्यमार्ग व ५ प्रमुख जिल्हामार्ग असे सात मार्ग बंद करण्यात आले आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली.