कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 09:25 AM2022-07-05T09:25:19+5:302022-07-05T09:43:07+5:30

Maharashtra Rain Updates: रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून याठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे

Maharashtra Rain Update : Torrential rains in Konkan; landslide in Parshuram Ghat, traffic jam for 20 hours | कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प

कोकणात मुसळधार पाऊस; परशुराम घाटात दरड कोसळली, २० तासांपासून वाहतूक ठप्प

Next

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मागील २० तासांपासून पाऊस सुरू आहे. युद्धपातळीवर दरड बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. याठिकाणची वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्यात आली आहे. चिपळूण परिसरात अवजड वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. 

पुढील ५ दिवस कोकणात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. परशुराम घाटात दरड कोसळल्याने याठिकाणची वाहतूक कळंबस्ते, लोटे मार्गे वळवण्यात आली आहे. तर लांजा तालुक्यातील काही भागात पाणी साचले आहे. या मार्गावर रस्त्यांची कामे सुरू असल्याने खडी, दगड मिश्रित चिखल मोठ्या प्रमाणात वाहून आल्यानेही वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. 

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
रत्नागिरीतील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून याठिकाणी लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. तर काजळी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. येथे सायरन वाजवून लोकांना अलर्ट दिला जात आहे. वशिष्ठ नदीच्या पातळीत होणारी वाढ लक्षात घेता आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिपळूण शहरात NDRF चे २० जवानांसह एक पथक तैनात करण्यात आले आहे. पुढील ५ दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. 

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला पूरस्थितीचा आढावा
हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून NDRF जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत

विशेषत: रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

Web Title: Maharashtra Rain Update : Torrential rains in Konkan; landslide in Parshuram Ghat, traffic jam for 20 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस