देशात निर्यातीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर
By Admin | Published: March 30, 2016 12:29 AM2016-03-30T00:29:27+5:302016-03-30T00:29:27+5:30
देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा ६९ टक्के असला तरीही त्यात एकट्या महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा ४६ टक्के आहे. निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला
नवी दिल्ली : देशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत आघाडीच्या पाच राज्यांचा वाटा ६९ टक्के असला तरीही त्यात एकट्या महाराष्ट्र आणि गुजरातचा वाटा ४६ टक्के आहे. निर्यातीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘असोचेम’ या उद्योग संघटनेच्या एका अभ्यास अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातशिवाय तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचा या पाच राज्यांत समावेश होतो. २००७-०८ ते २०१४-१५ या वित्तीय वर्षातील निर्यातीचे विश्लेषण केले असता पहिल्या स्थानासाठी महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात तीव्र स्पर्धा असल्याचे दिसून येते; मात्र २०१४-१५ या वर्षात ७२.८३ अब्ज डॉलरची निर्यात करून महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकले. या काळात गुजरातमधून ५९.५८ अब्ज डॉलरची निर्यात झाली. गुजरातनंतर तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. या काळात तामिळनाडूतून २४.४७ अब्ज डॉलरची निर्यात झाली. या अभ्यासात असे म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांना भौगोलिकदृष्ट्या विशाल सागरी किनारा असल्याने त्यांना निर्यातीत फायदा झाला. पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना मात्र निर्यात वाढविण्यासाठी रस्ता, रेल्वे आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सेवांत सुधारणा करणे आवश्यक आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते टिकून राहणार नाहीत. निर्यात वाढविण्यात विशेष आर्थिक क्षेत्राचीही (सेझ) महत्त्वपूर्ण भूमिका असू शकते. देशात सध्या सक्रिय असलेल्या एकूण ‘सेझ’पैकी तीन चतुर्थांश सेझ महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या सहा राज्यांत आहेत. विशेष म्हणजे हीच राज्ये निर्यातीत आघाडीवर आहेत. या अभ्यासात पुढे म्हटले आहे की, सध्याची अप्रत्यक्ष करप्रणाली निर्यातीला प्रोत्साहन देणारी नाही. त्याचबरोबर राज्या-राज्यात निर्यातीसाठी असलेल्या संधीत विविधता आहे. ही रचना ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमाच्या विरुद्ध आणि आयातीला प्रोत्साहन देणारी आहे.
निर्यातीचे वृद्धीदर कमी
- निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन्ही राज्ये अग्रेसर असली तरीही त्याचा निर्यातविषयक वृद्धीदर उत्तर प्रदेश व हरियाणा यासारख्या राज्यांपेक्षा कमी आहे.
- २०१४-१५ या वित्तीय वर्षात उत्तर प्रदेशची निर्यात १८.३ टक्के, तर हरियाणाची निर्यात १४.४ टक्के इतक्या वेगाने वाढली.
- गुजरातच्या निर्यात दराचा वेग ८ टक्के, तर महाराष्ट्राचा निर्यात दर ७.२ टक्के राहिला, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.