कुष्ठरोगात महाराष्ट्र चौथ्या स्थानी; सर्वाधिक रुग्ण चार जिल्ह्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 02:52 AM2019-11-19T02:52:07+5:302019-11-19T02:52:13+5:30
निर्मूलन कार्यक्रमाला खीळ
- सुमेध वाघमारे
नागपूर : आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने २०१७ मध्ये भारतात १,३५,४८५ नवे कुष्ठरोगी आढळून आले असल्याचे जाहीर केल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. कुष्ठरोगात महाराष्टÑ चौथ्या क्रमांकावर असून सर्वाधिक रुग्ण विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यात आहेत. रुग्ण वाढत असताना कुष्ठरोग निदान आणि त्याचे निवारण करणाऱ्या यंत्रणेला सर्वसाधारण गटात टाकण्यात आले आहे. यातच रिक्त पदे व आवश्यक सोयींचा अभाव असल्याने निर्मूलन कार्यक्रमाला खीळ बसत आहे.
शासनाने १९८२ पासून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला. कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व औषधोपचारामुळे २००४ पर्यंत १० हजारात एक कुष्ठरोगाचा रुग्ण, हे लक्ष्य गाठता आले. परिणामी, २००५ पासून या यंत्रणेला सर्वसाधारण गटात टाकण्यात आले. यामुळे निर्मूलन कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांकडे इतरही कामे आलीत. शिवाय या रोगामुळे मृत्यू होत नसल्याने व वर्षाेनुवर्षे हा रोग सुप्तावस्थेत राहत असल्याने दुर्लक्ष झाले. घरांना भेटी देणे, संशयित रुग्ण हुडकून काढणे, रुग्णांचे निदान करणे, त्याला उपचाराखाली आणणे आदी प्रकार थंडावले. कुष्ठरोगाचे रुग्ण वाढले. हे समोर येताच गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मिशन अंतर्गत महाराष्ट्रात कुष्ठरोग निदान मिशन राबविले जात आहे. पूर्वी मिशनअंतर्गत २२ जिल्ह्यांना समावून घेण्यात आले होते. यावर्षी संपूर्ण राज्यभरात हे मिशन राबविले जात आहे.
कुष्ठरोगात छत्तीसगड पहिल्या क्रमांकावर
राज्य २०१६-१७ २०१७-१८
छत्तीसगड ४३.६९ ३६.३३
ओडीसा २२.१३ २०.८३
बिहार १८.३८ १७.५९
झारखंड १६.८४ १३.७७
महाराष्ट्र १२.२२ १२.८९
राज्यात सर्वाधिक रुग्ण गडचिरोली जिल्ह्यात
गडचिरोली ८१.९० टक्के
चंद्रपूर ६६.७६ टक्के
पालघर ४२.८१ टक्के
भंडारा ४०.४६ टक्के
गोंदिया ३५.६८ टक्के
(एक लाख लोकसंख्येमागील रुग्णांची टक्केवारी)