दृष्टिदानात महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर
By admin | Published: June 10, 2015 02:02 AM2015-06-10T02:02:58+5:302015-06-10T02:02:58+5:30
जागतिक दृष्टिदान दिन विशेष.
नितीन गव्हाळे/ अकोला : आरोग्य विभागाकडून राज्यात नेत्रदानाविषयी जनजागृतीपर कार्यक्रम राबवूनही नेत्रदान करणार्यांची संख्या वर्षाकाठी १0 हजारांपर्यंतही पोहोचलेली नाही. राज्याला दरवर्षी १0 हजार नेत्रगोलकांची गरज असून, ती पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या दृष्टिदानाच्या आकडेवारीमध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो, तर तामिळनाडू अग्रस्थानी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना दरवर्षी नेत्रगोलक संकलनाचे उद्दिष्ट देण्यात येते. महाराष्ट्राला तीन वर्षांत १८ हजार ६00 नेत्रगोलक संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. राज्याने हे उद्दिष्ट पार करून २२ हजार १0१ नेत्रगोलक संकलित केले. तामिळनाडूला २१ हजार २00 नेत्रगोलकांचे उद्दिष्ट होते. या राज्याने २६ हजार ७0४ नेत्रगोलक संकलित केले. त्यापाठोपाठ गुजरातने २२ हजार ४00 नेत्रगोलकांचे उद्दिष्ट असताना २४ हजार ९0४ नेत्रगोलक संकलित केले. आंध्रप्रदेशने १८ हजाराचे उद्दिष्ट पार करीत १८ हजार १९८ नेत्रगोलक संकलित केले. देशात १.२0 कोटी लोक दृष्टिबाधित आहेत. त्यांच्या जीवनात प्रकाश देण्यासाठी दरवर्षी पाच लाखांवर नेत्रगोलकांची गरज आहे. तीन वर्षांमध्ये देशासमोर १ लाख ७0 हजार नेत्रगोलक संकलनाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १ लाख ४३ हजार ७२३ नेत्रगोलक संकलित करण्यात आले. देशात प्रत्येकी एक हजार व्यक्तींमागे केवळ १0 व्यक्तींचे नेत्रदान केले जाते. हे प्रमाण वाढविण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी देशाने आधी नेत्रदान, मगच अंत्यसंस्कार ही पद्धत स्वीकारली पाहिजे. तरच दृष्टिबाधितांच्या आयुष्यातील अंधार दूर होईल.
२0१४-१५ मध्ये झालेले राज्यनिहाय नेत्रदान
(माहिती ३ मार्चपर्यंतची)
राज्य उद्दिष्ट नेत्रदान
गुजरात- ४000 ८५४७
महाराष्ट्र- ६000 ६९४५
तामिळनाडू- ४000 ८१८९
प. बंगाल- १२00 १२५९
आंध्र प्रदेश- ६000 १७९१
कर्नाटक- ५000 १८0२
दिल्ली- १५00 १३७४
राजस्थान- १५00 ८१३
केरळ- ३000 १४५४
हरियाणा- १२000 १४५८