बलात्काराच्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्र 23 व्या स्थानी, महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांत दहावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:59 AM2021-09-23T11:59:33+5:302021-09-23T11:59:42+5:30
गेल्या एक वर्षात देशात झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथा आहे. महिलांवरील अत्याचाराच्या एकूण प्रकरणातदेखील क्राईम रेटमध्ये राज्य १० व्या नंबरवर आहे.
अतुल कुलकर्णी -
मुंबई : साकीनाक्यातील बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२० च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या क्राईम रेटमध्ये महाराष्ट्राचा २३ वा नंबर आहे. तर गेल्या एक वर्षात देशात झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथा आहे. महिलांवरील अत्याचाराच्या एकूण प्रकरणातदेखील क्राईम रेटमध्ये राज्य १० व्या नंबरवर आहे.
एनसीआरबी ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी संस्था आहे. दरवर्षी त्यांच्यावतीने देशातील गुन्हेगारीची आकडेवारी प्रकाशित केली जाते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची सूचना केली होती, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशभरात महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांची जंत्री राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात दिली होती. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रात महिलांवरील गुन्हे कसे कमी होत चालले आहेत, याची आकडेवारी दिली आहे.
गेल्या वर्षभरात देशात बलात्काराच्या जेवढ्या घटना झाल्या त्यात महाराष्ट्राचा चौथा नंबर आहे. सर्वाधिक घटना ५३१० बलात्कार राजस्थानमध्ये घडले आहेत. त्या खालोखाल उत्तरप्रदेश - २७६९, मध्यप्रदेश - २३३९, आणि महाराष्ट्र - २०६१ या राज्यांतील घटनांचा समावेश आहे. २०२० मध्ये २१९ बलात्कार करून खून केल्याच्या २१९ घटना देशात घडल्या. त्यातील २० घटना महाराष्ट्रातील आहेत. राज्यात २०१८ मध्ये २३ आणि २०१९ मध्ये १५ अशा घटना घडल्या होत्या. हुंडाबळीच्या घटनांचे गुन्हे नोंदवण्यामध्ये राज्याचा ९ वा क्रमांक आहे मात्र या गुन्ह्याच्या क्राईम रेटमध्ये राज्य देशात १८ व्या क्रमांकावर आहे.
अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात कमी होत आहे.
२०१८ ३५,४९७
२०१९ ३७,१४४
२०२० ३१,९५४
मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील गुजरात कनेक्शन
- राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुजरातविषयीची आकडेवारी दिली होती. त्या पत्रात ठाकरे यांनी, ‘गुजरात पोलिसांच्या रिपोर्टनुसारच रोज १४ महिलांवर बलात्कार, यौन शोषणसारख्या अत्याचारांचा सामना करावा लागत आहे.
- गेल्या काही काळात अहमदाबादमधून २९०८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत गुजरातमधून १४ हजार २२९ महिला बेपत्ता झाल्या.
- २०१५ सालापासून गुजरातमध्ये महिलांवरील निर्घृण अत्याचारांनी टोक गाठले आहे’, असा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपच्या राज्यातील नेत्यांनी त्या पत्राची होळीदेखील केली होती.
बलात्काराचा क्राईम रेट
राजस्थान १३.९%
दिल्ली १०.५%
हरयाणा १०.०%
आसाम ९.७%
मध्य प्रदेश ३.५%
महाराष्ट्र ३.५%
अत्याचाराची प्रकरणे
(महाराष्ट्राचा देशात १० वा नंबर)
ओडिशा ५५.८%
आसाम २७.२%
तेलंगण २६.३%
राजस्थान २२.७%
महाराष्ट्र १६.८%