अक्षय्य ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी; धाराशिव जिल्ह्यात लवकरच होणार हरितऊर्जा निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 21:03 IST2025-04-21T21:03:06+5:302025-04-21T21:03:36+5:30
गुजरात, तमिळनाडू, राजस्थान आणि कर्नाटक ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा आघाडीवर

अक्षय्य ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी; धाराशिव जिल्ह्यात लवकरच होणार हरितऊर्जा निर्मिती
रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय्य ऊर्जा निर्मितीच्या निकषांमध्ये महाराष्ट्र राज्य पाचव्या क्रमांकावर आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. प्रगतीशील राज्यांच्या ऊर्जा सक्षमतेच्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात आले. यात महाराष्ट्र राज्याला पहिल्या पाचात स्थान मिळाले असले तरीही महाराष्ट्राची सक्षमता पाहता ही बाब राज्य सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या सर्वेक्षणानुसार हे वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या अगोदर रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय्य ऊर्जा निर्मितीच्या क्षमता निकषांमध्ये गुजरात, तमिळनाडू, राजस्थान आणि कर्नाटक ही राज्य आहेत.
महाराष्ट्रात ५१ गिगावॅट तर गुजरातमध्ये ५८ गिगावॅट वीज निर्मिती
सद्य परिस्थितीत महाराष्ट्राला अक्षय्य ऊर्जा निर्मितीत अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. राज्यातील झपाट्याने होणाऱ्या विकासाच्या घडामोडींमुळे वीज वापराच्या बाबतीत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु अक्षय्य ऊर्जा प्रकारासह पारंपारिक ऊर्जा निर्मितीच्या निकषांच्या मध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी येतो. या निकषात देखील गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे. एकत्रित ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्रात ५१ गिगा वॅट तर गुजरातमध्ये ५८ गिगावॅट इतकी वीज निर्मिती होते. दिवसागणित वाढणाऱ्या विजेच्या वापरामुळे ही तफावत वाढत जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच हरित ऊर्जा प्रकारातील रिन्यूएबल एनर्जी निर्मिती वाढविणे ही महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे.
गुजरातमधून महाराष्ट्रला घ्यावी लागते वीज
ऊर्जा निर्मिती आणि पारेषण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, रिन्यूएबल एनर्जी ही तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील भार हलका होतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ऊर्जेच्या निर्मितीमुळे पर्यावरणास कुठलीही हानी होत नसल्याने ही वीज पर्यावरणपूरक असते. गुजरात राज्याच्या वाढत्या विकास दरामध्ये रिन्यूएबल एनर्जीचा वापर ही जमेची बाजू आहे. रिन्यूएबल ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या तुलनेत गुजरात राज्य महाराष्ट्र राज्यापेक्षा तब्बल दीडपट जास्त अक्षय्य ऊर्जा निर्माण करते. हाती आलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या महाराष्ट्रात १७.५ गिगा बॅट रिन्यूएबल ऊर्जा निर्मिती होते तर गुजरात राज्यात २७.५ गिगा वॅट ऊर्जा निर्मिती केली जाते. याच कारणामुळे गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्याला वीज घ्यावी लागते. परंतु रिन्यूएबल एनर्जी निर्माण करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्यातच सुरू झाली तर ऊर्जा सक्षमतेच्या दृष्टिकोनातून तो मैलाचा दगड ठरेल.
विकसनशील महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये लागेल हातभार
अशा प्रकारच्या ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. पुनर्वापराजोगी वीज शेतकऱ्यांना पुरवल्यास दरडोई उत्पन्नासाठी येणारा खर्च कमी होईल. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी एका विशेष उच्चस्तरीय बैठकीमध्ये ट्रान्समिशन प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत प्राधान्यक्रम देण्याबाबत संबंधित खात्यांना सूचना दिलेल्या आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यात अक्षय्य ऊर्जानिर्मितीचा टक्का वाढल्यास विकसनशील महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये फार मोठा हातभार लागेल.
ऊर्जानिर्मितीचे अनेकविध फायदे
अन्य सर्व निकषांमध्ये पहिल्या क्रमांकावर असणारे महाराष्ट्र राज्य ऊर्जा निर्मिती क्षेत्रात अव्वलस्थानी आल्यास त्याचा अनेक दृष्टीने फायदा होऊ शकतो. स्थानिकांना रोजगार, व्यवसाय संधी उपलब्ध होऊ शकतात. ऊर्जा सक्षम झाल्यामुळे नवनवीन उद्योगधंदे महाराष्ट्राकडे आकर्षित होतील. त्यानुसार पुन्हा एकदा राज्यामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. म्हणूनच राज्यातील नैसर्गिक पद्धतीने लाभलेल्या भौगोलिक परिस्थितीचा वापर करून घेत पवन ऊर्जा, सौर ऊर्जा या रिन्यूएबल एनर्जीद्वारे ऊर्जा निर्मिती वाढवणे हे राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने हितावह ठरेल.
धाराशिव जिल्ह्यात लवकरच हरितऊर्जा निर्मिती
सूत्रांच्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील कळंब, भूम आणि वाशी तालुक्यात रिन्यूएबल एनर्जी निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे हरित ऊर्जा निर्मितीला गती देण्याच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्र राज्याला ऊर्जासक्षम बनवण्यासाठी हे प्रकल्प वेळेत सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वसामान्य नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होतील. ऊर्जा मंत्रालयाने अधोरेखित केलेली उद्दिष्टपूर्तता झाल्यास रिन्यूएबल एनर्जी निर्मितीच्या पटलावर धाराशिव जिल्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात नावाजला जाईल यात दुमत नाही. या प्रकल्पांना इतके महत्त्व असूनही रिन्यूएबल एनर्जी निर्माण करणाऱ्या सेरेंटिका नावाच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर स्थानीय लोकांनी हल्ला करण्याची दुःखद घटना धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडली आहे. या प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांवर दुसऱ्यांदा अशा प्रकारचा हल्ला झाला आहे. या घटनेची नोंद वाशी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.