गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू - अंबादास दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:19 PM2024-07-12T18:19:16+5:302024-07-12T18:23:38+5:30

कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरल्याचीही केली परखड टीका

Maharashtra ranks second in crime, Chief Minister's show off instead of work - Ambadas Danve | गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू - अंबादास दानवे

गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, मुख्यमंत्र्यांची कामापेक्षा शोबाजी सुरू - अंबादास दानवे

Ambadas Danve, Maharashtra Monsoon Session 2024: देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे दाखल झाले असून त्यातील  ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर १०.२ % इतका असून महाराष्ट्र  देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे  ४  लाख ४५ हजार गुन्हे दाखल झाले असून ४५ हजार गुन्हे एकट्या महाराष्ट्रात दाखल आहेत. ऍसिड हल्ले, सायबर गुन्हे यात महिलांचे प्रमाण अधिक आहेत. एकीकडे सरकारने लाडकी बहीण योजना आणली मात्र प्रत्यक्षात महिलांचे संरक्षण करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री यांचा बुलडोझर फक्त काही भागात चालत असून ते कामापेक्षा शोबाजी जास्त करताता. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

 

"सरकार राज्याच्या विकासासाठी काम करत नसून स्वार्थ आणि भ्रष्टाचारासाठी काम करत असल्याचे दिसते. गृह विभाग हे विशिष्ट अधिकारी, कंत्राटदार यांच्यासाठी काम करते का की प्रस्ताव समोर ठेवून काम करते. या विभागातील अधिकारी जनतेच्या पैशाचा अपव्यय करतात आणि राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम करतात," अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातील  सुरू असलेला तपास, ग्रामीण भागात अवैधपणे सुरू असलेली गर्भलिंग चाचणी व गर्भपाताच्या घटना, शिरुर रांजणगाव येथे ३५० रोहित्रांची झालेली चोरी, पोलीस विभागात सुरू असलेले ई-चलनमधील गैरव्यवहार, राज्याचे मद्य धोरण, बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांच्या निविदा, विविध औद्योगिक वसाहतीत झालेले स्फोट, ऊर्जा विभागातील सबसिडीच्या नावाखाली सुरू असलेला भ्रष्टाचार, क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांची भ्रष्ट कारकीर्द अशा विविध विषयांवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृह विभागावर ताशेरे ओढले.

"सरकारने अर्थसंकल्पात अल्पसंख्याक विभागाला कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. राज्य सरकारचे माहिती व जनसंपर्क विभाग प्रसिद्धीसाठी माणसे नेमणार आहेत. मात्र तिथे ब्रिजेश सिंग हे आयपीएस अधिकारी उच्च पदावर आहेत. पोलिसांनी पोलीस खात्यात काम करावे, तेथे काम करण्यासाठी माहिती व प्रसारण खात्याचे लोक नाही का?" असा सवाल दानवे यांनी सरकारला विचारला.

"राज्यात सरकारने निविदेसाठी एक धोरण प्रक्रिया राबविली त्यामुळे अनेक उद्योजक देशोधडीला लागले.सर्वसामान्य ग्रामीण भागातील उद्योजकांचे कंबरडे मोडण्याचा काम या सरकारने केलं आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले हे सरकार असून कायदा सुव्यवस्था राखण्यास सरकारला अपयश आले आहे. जनतेच्या हिताविरोधी हे सरकार काम करणाऱ्या या सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत या सरकारला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही", असा इशाराही दानवे यांनी दिला.

Web Title: Maharashtra ranks second in crime, Chief Minister's show off instead of work - Ambadas Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.