‘नीट’मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक शेवटून दुसरा, या छोट्या राज्यांनी महाराष्ट्राला टाकले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 05:16 AM2020-10-18T05:16:47+5:302020-10-18T05:18:22+5:30
देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात महाराष्ट्राचा क्रमांक देशात शेवटून दुसरा लागला. शेजारचे छोटेसे छत्तीसगड राज्य देशात अव्वल आले आहे. यंदा नीटचा कट आॅफ गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ गुणांनी वाढला आहे.
देशभरातील सर्व राज्यांपेक्षा नीट परीक्षा देणाºया महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदा राज्यात नोंदणी केलेल्या २ लाख २७ हजार ६५९ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९५ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ७९ हजार ९७४ विद्यार्थी पात्र ठरले असून राज्याचा निकाल ४०.९५ टक्के लागला आहे. देशात नागालँडचा निकाल सर्वात कमी ४०.५० टक्के लागला असून त्यापेक्षा महाराष्ट्राचा निकाल किंचित बरा आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र नीट परीक्षेत शेवटून चौथ्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षी निकालात महाराष्ट्राच्या खाली असलेल्या मेघालय व मिझोराम राज्यांनीदेखील यंदा महाराष्ट्राला मागे टाकले आहे.
प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक हरीश बुटले म्हणाले, नीट परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का घसरत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे शैक्षणिक धोरणकर्ते, संस्थांचालक, शिक्षक-पालक, विद्यार्थी अशा सर्वांनाच हा निकाल गांभीर्याने घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय राज्याचा ‘नीट’ टक्का वाढणार नाहीे.
छोट्या राज्यांनी घेतली निकालात आघाडी -
यंदा निकालात छत्तीसगड व दिल्ली अव्वल दोन क्रमांकावर असून छत्तीसगडचा निकाल ७५.६४ टक्के तर दिल्लीचा निकाल ७५.४९ टक्के लागला आहे, तर हरियाणाचा निकाल ७२ टक्के लागला. तसेच केरळसारख्या लहान राज्याचा निकाल ६३.९४ टक्के असून कर्नाटकचा निकाल ६१.५६ टक्के आहे.
अभ्यासक्रम कोणताही असला तरी नीट सारख्या प्रवेश पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी वेगळी तयारी लागते. राज्यात त्यासाठी सेंटर उभे करावे लागतील. तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महत्वाकांक्षा बाळगून त्यादृष्टीने तयारी करावी लागेल. तेव्हाच निकाला वाढ होऊ शकेल.
- डॉ. वसंत काळपांडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ.