Corona In Maharashtra: निष्काळजीपणा नको! महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा वेग वाढला, नव्या व्हेरिअंटचे १८ रुग्ण आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 10:00 PM2022-10-19T22:00:29+5:302022-10-19T22:01:11+5:30
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. कोरोना रुग्णांमध्ये जसजशी वाढ होत आहे, तसं ओमायक्रोनचेही उप-प्रकार समोर येत आहेत. ...
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने चिंता वाढवली आहे. कोरोना रुग्णांमध्ये जसजशी वाढ होत आहे, तसं ओमायक्रोनचेही उप-प्रकार समोर येत आहेत. १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत Omicron XBB उप-प्रकारचे एकूण १८ रुग्ण आढळून आले आहेत. Omicron च्या BA.2.75 आणि BJ.1 उप-प्रकारांचे हे संयुक्त रुप आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने बुधवारी याबाबतची माहिती दिली. या १८ रुग्णांमध्ये पुण्यातील १३, ठाणे आणि नागपूरमधील प्रत्येकी २ आणि अकोल्यात एका रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४१८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीचा सण लक्षात घेता राज्य सरकारने ओमायक्रॉनच्या XBB व्हेरिअंटसाठी अलर्ट जारी केला आहे आणि कोविड 19 प्रोटोकॉलचे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार XBB व्हेरिअंट इतर सर्व उप-प्रकारांपेक्षा प्रबळ आहे. जो जगाच्या अनेक भागांमध्ये आढळून आला आहे.
Maharashtra reports 418 fresh #COVID19 cases, 515 recoveries and 03 death in the last 24 hours.
— ANI (@ANI) October 19, 2022
As per state INSACOG, 18 cases of XBB variant were reported in the state in the first fortnight of October pic.twitter.com/rYKTapJtFh
दिवाळीपूर्वी महाराष्ट्र-केरळमध्ये नवा धोका, मुंबईत तीन दिवसांत १५० रुग्ण
मुंबईत गेल्या तीन दिवसांत १५० हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या ५ दिवसांत १० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाचे ४७७ रुग्ण आढळले होते. त्यापैकी १७८ रुग्ण एकट्या मुंबईतील होते. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये गर्दी वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राशिवाय केरळमध्येही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.
हिवाळ्यात प्रसार वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
थंडीच्या दिवसात कोरोनाबाधितांची संख्या आणखी वाढू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईत इन्फ्लूएंझासारख्या आजारांवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. इन्फ्लूएंझा हा देखील संसर्गजन्य रोग आहे. तो शिंकण्याने पसरतो. तज्ज्ञांनी अशी भीतीही व्यक्त केली आहे की, काही लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो पण ते त्याला किरकोळ सर्दी-खोकला समजू शकतात, त्यामुळे इतरांमध्ये पसरण्याचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांनी पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्क काटेकोरपणे वापरण्याचा सल्ला दिला आहे.