CoronaVirus in Maharashtra : चिंताजनक! राज्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात ४३ हजार १८३ नवे रुग्ण, २४९ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:23 PM2021-04-01T21:23:56+5:302021-04-01T21:32:51+5:30
CoronaVirus in Maharashtra : दिवसभरात ३२ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४ लाख ३३ हजार ३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर ३२ हजार २४९ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. (Maharashtra reports 43,183 new COVID-19 cases, 32,641 recoveries, 249 deaths in the last 24 hours)
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, २४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३२ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४ लाख ३३ हजार ३६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता साडे-तीन लाखांवर गेली आहे. सध्या ३ लाख ६६ हजार ५३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याचबरोबर, आतापर्यंत ५४ हजार ८९८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 43,183 new COVID-19 cases, 32,641 recoveries, 249 deaths in the last 24 hours
— ANI (@ANI) April 1, 2021
Total cases: 28,56,163
Total recoveries: 24,33,368
Active cases: 3,66,533
Death toll: 54,898 pic.twitter.com/aPpugamW74
मुंबईत कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी
मुंबईत गेल्या २४ तासांत वाढलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. मुंबईत आज तब्बल ८ हजार ६४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे कालच्या आकडेवारीपेक्षा आज ३ हजार अधिक रुग्ण वाढले आहेत. बुधवारी मुंबईत ५ हजार ३९४ रुग्ण वाढले होते. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी रुग्णांची आकडेवारी लक्षणीयरित्या वाढत आहे. सध्या शहरात ५५ हजार ००५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा वेग ४९ दिवसांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एकूण १८ जणांना कोरोनामुळे जीव गमावावा लागला आहे.
(धोक्याची घंटा! धारावी, माहिम, दादरमध्ये पुन्हा वाढतोय करोना; चिंता वाढवणारी आकडेवारी समोर)
रुग्ण संख्या वाढत असल्याने मुंबईत कडक निर्बंध
कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मुंबई सध्या डेंजर झोनमध्ये आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत असल्याने त्यावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारपासून कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच लोकलमधील प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वसामान्य दिलेली प्रवासाची परवानगी पुन्हा रद्द करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वृद्ध, लहान मुले मोठ्या संख्येने जातात. त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद केली जातील. हॉटेलमध्ये ५० टक्के उपस्थिती, चित्रपटगृह, मॉल बंद केले जातील. सामान्य प्रवाशांना लोकलमधील प्रवास बंद करुन अत्यावश्यक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा दिली जाईल, खाजगी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीवर भर, दुकाने एक दिवस सोडून उघडली जातील, असे महापौरांनी सांगितले.