Coronavirus: राज्यात ८ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ९०९ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 09:01 PM2021-07-10T21:01:34+5:302021-07-10T21:04:00+5:30
Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ६ हजार ०२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.०५ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ८ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8296 new corona cases and 179 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार २९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ६ हजार ०२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण १ लाख १४ हजार इतकी आहे.
Maharashtra reports 8,296 new cases, 6,026 recoveries, and 179 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 10, 2021
Total cases 61,49,264
Total recoveries 59,06,466
Death toll 1,25,528
Active cases 1,14,000 pic.twitter.com/Tcac7YUz6A
मुंबईकरांना काहीसा दिलासा
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५०४ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७३६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ६१२ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ७ हजार ४८४ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ९०९ दिवसांवर गेला आहे.
COVID19 | Mumbai reports 504 new cases and 13 deaths today; the number of active cases is 7,484 pic.twitter.com/OKYUQ729cd
— ANI (@ANI) July 10, 2021
दरम्यान, राज्यात एकूण ४ कोटी ३८ लाख १३९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ४९ हजार २६४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ५ लाख ८५ हजार ५८० जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ७३७ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.