Coronavirus: दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.१७ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ९२८ दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:31 PM2021-07-14T21:31:19+5:302021-07-14T21:33:28+5:30
Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.
मुंबई: राज्यातील जनतेसाठी काहीसे चिंताजनक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ६ हजार ०६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.१७ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ८ हजार ६०२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports 8602 new corona cases and 170 deaths in last 24 hours)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ८ हजार ६०२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ६ हजार ०६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ४४ हजार ८०१ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण १ लाख ०६ हजार ७६४ इतकी आहे.
देशात उद्धव ठाकरेच ‘लय भारी’ कारभारी; लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये ठरले नंबर १
मुंबईकरांना काहीसा दिलासा
गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ६३५ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ५८२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ६४४ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे ६ हजार ९८९ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०७ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ९२८ दिवसांवर गेला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 14, 2021
१४ जुलै, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना#NaToCoronapic.twitter.com/NBJud1PC3F
दरम्यान, राज्यात ५ लाख ८० हजार ७७१ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ४ हजार ३०९ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. तर, नंदूरबार, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.