Maharashtra Doctors Strike : मार्डच्या संपामुळे रुग्णांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:01 AM2021-10-02T06:01:24+5:302021-10-02T06:01:44+5:30
या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णव्यवस्था काहीशी कोलमडलेली दिसून आली.
मुंबई : शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही अनेक महिने उलटले तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने अद्याप कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने अखेर शुक्रवारपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टर सहभागी झाल्याने रुग्णव्यवस्था काहीशी कोलमडलेली दिसून आली.
सायन रुग्णालयात बाह्यरुग्ण सेवा बंद होती, तर पालिकेच्या अन्य रुग्णालयांत बाह्य रुग्ण विभागात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा दिली. नायर, केईएम, सायन, सेंट जॉर्ज, जे. जे. यांसारख्या रुग्णालयांत निवासी डॉक्टरांनी फलक हाती घेऊन निषेध नोंदवला. राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमधील सेवा कमी-अधिक प्रमाणात विस्कळीत झाल्याची दावा मार्डने केला. संपकाळात आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू असतील, असे मार्डने स्पष्ट केले.
मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत बैठक झाली, परंतु राज्य शासनाकडून लेखी ग्वाही मिळाली नाही, त्यामुळे संप सुरूच राहील, अशी माहिती सेंट्रल मार्डचे डॉ. नीलेश नायर यांनी दिली आहे.