महाराष्ट्राचे 'फायर ब्रँड' राज ठाकरे 'फ्लॉवर' झाले का?; रुपाली ठोंबरेंचा बोचरा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 05:36 PM2022-04-03T17:36:54+5:302022-04-03T17:38:28+5:30
महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर राज ठाकरेंनी चकार शब्दही काढला नाही : रुपाली ठोंबरे
"दरवर्षी पाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा होते. परंतु यापूर्वी ती कोरोनामुळे झाली नाही. राज ठाकरे महाराष्ट्राचे फायर ब्रँड आहे. परंतु शनिवारच्या सभेत भाजपनं जी सुडबुद्धीची कारवाई केली तिथं कुठेतरी हे फायब्रँड पुष्पासारखे फ्लॉवर झाले का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात येतो," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गुढीपाडव्यानिमित्त सभा पार पडली. या सभेदरम्यान त्यांनी अनेकांवर जोरदार निशाणा साधला.
"राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातीयवाद नाहीच. या पक्षात सर्व जातीची, पंथाची, धर्माची लोकं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंत्रीदेखील आहेत. अशा पक्षात जातीयवाद असूच कसा शकतो. जातीयवाद असताच तर विशिष्ट समाजाची लोक त्यात असायला हवी होती. परंतु तसं नाही. त्या वक्तव्याला काही अर्थ नाही," रुपाली पाटील म्हणाल्या. ज्या सुडबुद्धीनं भाजपनं ईडी लावली त्याला न घाबरता उभे राहणारे शरद पवार हे देशातील एकमेव नेते आहेत. शरद पवार पाठीशी ठामपणे उभे राहिल्यानं महाविकास आघाडीच्या लोकांच्या मागे हा ससेमिरा लावल्यानंतरही ते घाबरत नसल्याचंही त्या म्हणाल्या.
"महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर राज ठाकरेंनी चकार शब्दही काढला नाही. सार्वजनिक ठिकाणचे भोंगे काढण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाचा होता. परंतु हा त्यांनी राबवला नाही. त्यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. भाजपकडे विकासाचा एकही मुद्दा राहिलेला नाही. म्हणून जातीपातीचे प्रयोग करण्याचं काम ते करत आहे. त्यांना कोणीही गंभीरपणे घेत नाही. म्हणून इतर पक्षाच्या लोकांना ईडीची धमकी द्यायची, कारवाया करायच्या आणि आपल्याकडे बोलतं करायचं असा प्रयोग सुरू आहे. महाराष्ट्रातील जनताही याला भूलणार नाही," असंही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.