अडीच वर्षे राज्यमंत्री फक्त नावालाच, अधिकारही नव्हते; शंभूराज देसाईंनी मांडली रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:48 PM2022-06-27T16:48:30+5:302022-06-27T16:48:47+5:30
आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी विनंती असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले.
“गेली अडीच वर्षे आम्ही राज्यमंत्री फक्त नावालाच; आम्हाला काहीच अधिकार नव्हते. अडीच वर्षात कॅबिनेट मंत्री-राज्यमंत्री अधिकार वाटप देखील झाले नाही. राज्यमंत्री असून देखील आम्हाला आमच्या मतदारसंघात फंड मिळत नव्हता. याउलट आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराना उपमुख्यमंत्री अजित पवार ताकद देत होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे यासंदर्भांत वारंवार तक्रारी करूनही कधीही कारवाई झाली नाही,” अशी रोखठोक भूमिका बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी मांडली.
“नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरड येथील समाधी स्थळ परिसराचा विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील कार्यक्रमात शब्द दिला होता. अर्थ आणि वित्त राज्य मंत्री नात्याने या निर्णयाची मी विधानपरिषदेत घोषणा केली होती. यासाठी ५ कोटी रुपये निधी तरतूद करण्याची शिफारस अर्थराज्य मंत्री या नात्याने मी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. मात्र वारंवार पाठपुरावा करून देखील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळ विकासासाठी ५ कोटी रुपये देखील मंजूर करण्यात आले नाहीत,” असे शंभूराज देसाई म्हणाले.
#सातारा जिल्ह्यातील #पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच गृह राज्यमंत्री श्री.शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पक्षासोबत कसा दुजाभाव झाला याचे एक मनोगत मांडले ते खालीलप्रमाणे आहे…@shambhurajdesai#MiShivsainikpic.twitter.com/b3ywV8Tb0s
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
आम्हा राज्यमंत्र्याची ही अवस्था असेल तर आमदारांच्या बाबतीत काय परिस्थिती असेल याचा आपण विचार करा. म्हणूनच आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्याचा हा निर्णय घेतला. आमची ही भूमिका शिवसेनेच्या हिताचीच असून सर्वसामान्य शिवसैनिकांनी देखील ती समजून घ्यावी अशी माझी विनंती असल्याचंही ते म्हणाले.