शाळांमध्ये आता मोदींचा अभ्यास ! राज्य सरकार करणार मोदींवरील दीड लाख पुस्तकांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 04:19 PM2018-02-14T16:19:02+5:302018-02-14T16:21:34+5:30
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापेक्षाही महाराष्ट्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अधिक प्रेमात पडलं आहे.
मुंबई: महाराष्ट्र सरकार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित पुस्तकं शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणार आहे. राज्य सरकारने पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित जवळपास दीड लाखं पुस्तकं खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल 59.42 लाख रुपये मोजण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, महात्मा गांधीवरील पुस्तकं खरेदी करण्यासाठी केवळ सव्वा तीन लाख रूपये खर्च केले जाणार आहेत. जानेवारीतच या पुस्तकांच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत ही पुस्तके येण्याची शक्यता आहे.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांच्या खरेदीसाठी 24.28 लाख रूपये (79,388 पुस्तके), माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील पुस्ताकांसाठी 21.87 लाख रूपये आणि महात्मा फुलेंवरील पुस्कांसाठी 22.63 लाख रूपये (76,713 पुस्तके) मोजण्यात येणार आहेत. हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि मराठी भाषेतील ही पुस्तके जिल्हा परिषदांच्या ग्रंथालयात ठेवण्यात येणार आहेत. ग्रंथालयात इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके सहज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. या पुस्तकांच्या खरेदीसाठी सर्व शिक्षा अभियानाचा निधी खर्च करण्यात आला आहे.
शिक्षण विभागाने इतर महापुरुषांवरील 1 कोटी 30 लाख 50 हजार 839 पुस्तके मागविली आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अधिक प्रेमात पडल्याचं दिसतं कारण राजकारण्यांमध्ये मोदींनाच महत्त्व देण्यात आले असून त्यांच्यावरील 1.5 लाख पुस्तके मागिवली आहेत. विद्यार्थ्यांना कार्टुनच्या माध्यमातून मोदींबाबत अधिक माहिती मिळावी म्हणून नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील कॉमिकही मागविण्यात आले असल्याची माहिती आहे. जवाहरलाल नेहरूंवरील केवळ 1635 आणि इंदिरा गांधी यांच्यावरील 2 हजार 675 पुस्तके मागवण्यात आली आहेत.
माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरील 3 लाख 21 हजार 328 आणि छत्रपती शाहू महाराजांवरील 1 लाख 93 हजार 972 पुस्तकांचा समावेश आहे. सर्वाधिक छत्रपती शिवाजी महाराजांवरील 3 लाख 40 हजार 982 पुस्तकांचा समावेश आहे.
या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील पुस्तके खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, हा मोठा विनोदच आहे. नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्वच नेते आत्मस्तुतीत मग्न झाले असून खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरून म. गांधींचे चित्र काढून स्वतःचे छायाचित्र लावण्याच्या मोदींच्या निर्णयापासून देशातील जनता हे पाहते आहे. गांधीजींचा विचार पुसण्याची क्षमता नव्हती, म्हणून त्यांचा खून करण्यात आला. मात्र गांधीजींचे विचार जगाने आत्मसात केल्याने आता पुस्तकातून त्यांची नावे खोडण्याचे उद्योग या सरकारने सुरू केले आहेत. योग्य वेळी जनता या सरकारला धडा शिकवेल, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
तर ‘शालेय विद्यार्थ्यांसाठी घेतलेले पुस्तक हे ऐतिहासिक म्हणून घेतले की, धार्मिक पुस्तक म्हणून घेतले, याचा खुलासा राज्य सरकारने करावा,’ असा टोमणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.