मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्र ‘शायनिंग’
By Admin | Published: July 5, 2016 11:31 PM2016-07-05T23:31:12+5:302016-07-06T00:13:50+5:30
रामदास आठवले व डॉ. सुभाष भामरे यांना राज्यमंत्री म्हणून मिळालेले स्थान लक्षात घेता, केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे महत्त्व निश्चितपणे वाढले
- संजीव साबडे
मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर प्रकाश जावडेकर यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती आणि रामदास आठवले व डॉ. सुभाष भामरे यांना राज्यमंत्री म्हणून मिळालेले स्थान लक्षात घेता, केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्राचे महत्त्व निश्चितपणे वाढले आहे. नितीन गडकरी, सुरेश प्रभु, प्रकाश जावडेकर, अनंत गीते, हंसराज अहीर, पीयूष गोयल, डॉ. सुभाष भामरे आणि रामदास आठवले असे तब्बल आठ जण मोदी मंत्रिमंडळात आहेत. शिवाय महाराष्ट्रातील तीन राज्यमंत्र्यांकडे गृह, संरक्षण व समाजकल्याण ही महत्त्वाची खाती पंतप्रधानांनी दिली आहेत.
महाराष्ट्रात भाजपा भक्कम व्हावी आणि शिवसेनेला शह देणे शक्य व्हावे, असा उघड हेतू यातून दिसत आहे. बहुधा त्याचमुळे विस्तारात शिवसेनेला मंत्री वा राज्यमंत्रीपद देण्यात आले नाही. इतकेच नव्हे, तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेशी भाजपा नेत्यांनी वा पंतप्रधानांनी चर्चाही केली नाही.
(गुजरात दंगलीत मोदींना लक्ष्य करणारे झाले कॅबिनेट मंत्री)
नितीन गडकरी यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलवाहतूक आणि बंदरे विकास अशी अतिशय महत्त्वाची खाती आहेत. त्यांनी मंत्री झाल्यापासून रस्तेबांधणीपासून बंदरेविकासापर्यंत सर्व खात्यांत कामांचा धडाकाच लावला आहे. अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची केंद्रात आणि देशभर ओळख आहे.
सुरशे प्रभु यांच्याकडे रेल्वे मंत्रीपदाचा कारभार असून, त्यांनी केलेल्या विकासामुळे रेल्वेचे कामकाज सुधारले आहे. शिवाय राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभु यांनी थेट प्रवाशांना रेल्वे खात्याला जोडले आहे. त्यातून सुधारणाही होत आहेत.
आतापर्यंत वने व पर्यावरण खाती स्वतंत्रपणे हाताळणाऱ्या प्रकाश जावडेकर यांना पदोन्नतीबरोबरच मनुष्यबळ विकास हे तितकेच महत्त्वाचे खाते मिळाले. स्मृती इराणी यांच्याकडून ते काढून घेतले हेही लक्षणीयच म्हणावे लागेल. जावडेकर यांनी आतापर्यंत असलेल्या खात्याचे काम उत्कृष्टपणे करताना अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आणि ते मार्गी लावले. त्याशिवाय पीयूष गोयल यांच्याकडेही ऊर्जा, खाणी, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा अशी महत्त्वाची खाती देउन पंतप्रधानांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, तो गोयल यांनी सार्थ करून दाखवला आहे.
(भामरे यांच्या समावेशाने खडसेंच्या वर्चस्वाला शह)
राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रसायने आणि उर्वरक खात्यात चांगले नाम करून पंतप्रधानांनाचा विश्वास संपादन केल्याचे दिसत आहे. बहुधा त्याचमुळे फेरबदलांमध्ये गृह खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यात त्यांना राज्यमंत्री म्हणून आणले आहे. मंगळवारी शपथ घेतलेले डॉ. सुभाष भामरे यांना नवे राज्यमंत्री म्हणून फारसे महत्त्वाचे खाते मिळणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हाताखाली राज्यमंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळणार आहे.
रामदास आठवले यांना राज्यमंत्री केल्याने दलित समाज आपल्यासोबत राहील, याचा प्रयत्न भाजपा कायम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. आंबेडकरी चळवळीचे व दलित समाजाचे मोठे नेते असलेल्या आठवले यांना समाजकल्याण खाते देण्यात आले आहे. त्यांनी दलित, आदिवासी शोषित यांच्या कल्याणाचे काम खात्यामार्फत करावे, हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
शिवसेनेचे अनंत गीते यांच्याकडे अवजड उद्योग खाते असले तरी त्यात काही करून दाखवण्यासारखे काही नाही. शिवाय असलेल्या खात्यात त्यांनी काही वैशिष्ट्यपूर्ण काम करून दाखवल्याचे दिसलेले नाही वा ते प्रभावी संसदपटू वा मंत्री म्हणून काम करताना जाणवलेले नाही.
केंद्रात मंत्री झालेले गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले, तर रावसाहेब दानवे यांना राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून यावे लागले. पण त्यांच्या जागाही आता भरण्यात आल्या, असाही आजच्या शपथविधीचा अर्थ लावता येईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)