Maharashtra SSC Results 2018 : राज्यातील १२५ विद्यार्थांचे शतक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 03:11 PM2018-06-08T15:11:36+5:302018-06-08T15:11:36+5:30
बेस्ट आॅफ फाइव्ह पध्दतीने राज्यातील १२५ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश आले आहे.
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च/एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल ८९.४१ टक्के लागला आहे. बेस्ट आॅफ फाइव्ह पध्दतीने राज्यातील १२५ विद्यार्थांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश आले आहे.
दहावीच्या निकाला मध्ये लातूर पॅटर्नला पुन्हा चांगले यश मिळाले आहे. शंभर टक्के गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांमध्ये लातूर विभागातील सर्वाधिक ७० विद्यार्थी असून त्यापाठोपाठ औरंगाबादमधील २३, कोल्हापूर ११, पुण्यामधील ४, अमरावती ६, कोकण ४, नागपूर २, नाशिक १ विद्यार्थी आहे. राज्यातील एकूण १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात अव्वल राहण्याची परंपरा मुलींनी कायम राखली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.९७ तर मुलांची ८७.२७ इतकी आहे. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४.७० टक्क्यांनी जास्त आहे.
राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेमध्ये दहावीचा निकाल जाहीर केला. राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी (८९.४१ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी दहावीचा निकाल ८८.७४ टक्के लागला होता, त्यातुलनेत यंदाच्या निकालात ०.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
राज्यातील ९ विभागीय मंडळांमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६ टक्के इतका लागला आहे तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ८५. ९७ टक्के इतका लागला आहे. मुंबई ९०.४१, कोकण ९६, पुणे ९२.०८, नाशिक ८७.८२, नागपूर ८५.९७, कोल्हापूर ९३.८८, अमरावती ८६.४९, औरंगाबाद ८८.८१, लातूर ८६.३० अशी विभागनिहाय निकालाची टक्केवारी आहे. राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ८६.८७ टक्के इतका लागला आहे.
मागील वर्षी १९३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते, यंदा १२५ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळविण्यात यश मिळाले आहे. कला व क्रीडाच्या अतिरिक्त २५ गुणांच्या जोरावर १०० टक्के गुण मिळविण्यात विद्यार्थ्यांना यश मिळते आहे. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या ६३ हजार ३३१ इतकी आहे. तर ३५ ते ४५ टक्क्यांदरम्यान गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९९ हजार २६२ इतकी आहे. ४ लाख ३ हजार १३७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, ५ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत कॉपीचे गैरप्रकार करणाºया ६६१ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मंडळाकडून एकूण ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती, त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.