ST Workers Strike : एसटी कामगारांच्या संपात फूट?; रस्त्यांवर पुन्हा धावू लागली लालपरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 08:48 PM2021-11-12T20:48:50+5:302021-11-12T20:49:11+5:30

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तब्बल २ हजार कामगार डेपोंमध्ये परतल्याची माहिती आहे.

maharashtra st workers strike busses started running on road again | ST Workers Strike : एसटी कामगारांच्या संपात फूट?; रस्त्यांवर पुन्हा धावू लागली लालपरी

ST Workers Strike : एसटी कामगारांच्या संपात फूट?; रस्त्यांवर पुन्हा धावू लागली लालपरी

googlenewsNext

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शंभर टक्के एसटीचा बसेस बंद होत्या. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर तब्बल २ हजार कामगार डेपोंमध्ये परतल्याची माहिती आहे. मोठ्या संख्येने कामगार कामावर परतू लागले आहे. आज १७ डेपोंमधून बस सोडण्यात आलेल्या आहे. या बसेसमधून ८०० पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. तसेच आझाद मैदान येथे सुरु असलेल्या संपात सुद्धा कामगारांची संख्या आज निम्म्याने कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे आज एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फूट पडल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारालेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुद्धा संप करण्यास नकार दिला होता. तरी सुद्धा कर्मचाऱ्यांनी संपावर गेले. यामुळे आता प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून राज्यातील खाजगी बस संघटनाना राज्यातील विविध स्टँडवरून खासगी बस गाड्या सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. याचबरोबर एसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहे. त्यांनाही पोलीस संरक्षण देऊन २ हजार कर्मचारी आज कामावर रुजू केले आहे. त्यामुळे आज राज्यभरातील १७ डेपोंमधून एकूण ३६ बस सोडण्यात आलेल्या आहे. या बसेसमधून ८०० पेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

एसटी डेपोंमधून खासगी बस सोडल्या
प्रवाशांचा सुविधेसाठी एसटी डेपोंमधून एसटी बसेस, खासगी ट्रॅव्हल्स आणि वडापच्या गाड्या सोडण्यात येत आहेत. काही आंदोलकांकडून राज्यभरताची आठ ते दहा ठिकाणी एसटी आणि खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी कालपर्यत राज्यभरात ३६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय काही लोकांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सध्या एसटी संपाआडून उपद्रव माजवणाऱ्या कामगारांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे शेखर चन्ने यांनी सांगितले.  

कोट्यवधी रूपयांचा फटका
अगोदरच कोरोनामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षांत एसटी महामंडळाला विक्रमी तोटा सहन करावा लागलेला आहे. आता एसटी महामंडळाचे आर्थिक चाक पूर्वपदावर येत असतानाच ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महामंडळाचे आणखी नुकसान न करता कामगारांनी कामावर परतण्याची गरज आहे. कामगार हे महामंडळाचेच असून त्यांना आणखी एक संधी दिली जात असल्याने इतक्यात मेस्मा सारखी कारवाई करणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील बेस्ट, पीएमपीएल अशा स्थानिक परिवहन यंत्रणांची मदत घेत असल्याचे महामंडळाने सांगितले. अतिरिक्त बसेसच्या माध्यमातून स्थानिक परिवहन संस्थांना प्रवासी वाहतुकीचा बोजा हलक करण्याचे आदेश दिलेले आहेत. याशिवाय परिवहन आयुक्तांच्या मदतीने अधिकाधिक खासगी बसेसच्या माध्यमातून लाखो प्रवाशांची प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.  
 
कोठे किती प्रवासी?
मुंबई-सातारा - १५ प्रवासी, दादर-पुणे  ५५ प्रवासी, ठाणे-स्वारगेट १६ प्रवासी, स्वारगेट-दादर  ४४ प्रवासी, स्वारगेट-ठाणे(शिवनेरी)  ७८ प्रवासी, स्वारगेट-कोल्हापूर  ३५ प्रवासी,स्वारगेट-मिरज १८ प्रवासी, पुणे स्टेशन-दादर  १६८ प्रवासी, पुणे-नाशिक  ६५ प्रवासी, नाशिक-पुणे १२६ प्रवासी, नाशिक-धुळे ५० प्रवासी, राजापूर-बुरुंबेवाडी  २२ प्रवासी, अक्कलकोट-सोलापूर  ३७ प्रवासी ,इस्लामपूर-वाटेगाव २७ प्रवासी आणि सांगली-पुणे ३२ प्रवासी असे आज एकूण ३६ बसेसमधून ८२६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

Web Title: maharashtra st workers strike busses started running on road again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.