महाराष्ट्र स्टेट को-आॅप हाऊसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदी व्ही.बी.पाटील, बिनविरोध निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:59 PM2018-07-16T13:59:14+5:302018-07-16T14:14:17+5:30
महाराष्ट्र स्टेट को-आॅप हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्ही. बी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे सुनिल देवीदास जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी प्रशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संस्थेच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा झाली.
कोल्हापूर : वार्षिक दीडशे कोटींची उलाढाल आणि एक हजार ७१० मतदार असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-आॅप हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी येथील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्ही. बी. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी औरंगाबादचे सुनिल देवीदास जाधव यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक अधिकारी प्रशांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संस्थेच्या मुख्यालयात संचालक मंडळाची सभा झाली.
व्ही. बी. पाटील हे संचालक म्हणूनही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांनी यापूर्वी संचालक व अध्यक्ष म्हणूनही या संस्थेत चांगले काम करून दाखविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते अत्यंत निकटवर्ती मानले जातात.
अडचणीत असलेल्या म्हणजे कर्जव्यवहार बंदच असलेल्या या संस्थेला नव्याने उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठीच यापूर्वीचा चांगल्या कामाचा अनुभव असलेल्या पाटील यांच्याकडे संस्थेची जबाबदारी देण्यात आली आहे.
संस्थेच्या निवडणुकीत १२ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने कब्जा केला. काँग्रेसला चार, तर भाजपला पाच जागा मिळाल्या होत्या. दोन्ही काँग्रेसची आघाडी होती. या संस्थेची निवडणूक तब्बल ११ वर्षांनंतर यंदा १ जुलैला झाली. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी राज्यभरातील १७०८ गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी मतदानाचा हक्क होता.
दि महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशन लि.मुंबईच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी पंचवार्षिक (२०१८ ते २०२३) निवडणूक झाली. गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी याचे मतदार आहेत. ही संस्था सोसायट्यांना तर सोसायट्या सभासदांना गृहनिर्माणासाठी वित्त पुरवठा करते. या कार्पोरेशनचे २१ पैकी सात संचालक बिनविरोध झाल्याने उर्वरित १४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले होते.
काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्तपणे प्रगती पॅनल रिंगणात उतरविले. पुण्याचे राष्ट्रवादीचे माजी महापौर अंकुश काकडे, जळगावचे आमदार डॉ. सतीश पाटील आणि औरंगाबादचे काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड या पॅनलचे नेतृत्व करीत होते. तर भाजपा समर्थित सहकार पॅनल रिंगणात असून मुंबईचे आमदार प्रवीण दरेकर व नाशिकचे माजी आमदार वसंत गिते त्याचे नेतृत्व करीत होते.
हाऊसिंग फायनान्स कार्पोरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद अनुक्रमे रवींद्र गायगोले (अमरावती) व योगेश पारवेकर (यवतमाळ) यांच्या रुपाने भाजपाच्या हाती आणि त्यातही विदर्भाकडे होते.
सात संचालक अविरोध
कार्पोरेशनच्या या निवडणुकीत सात संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रगती पॅनलचे आमदार डॉ. सतीश पाटील (जळगाव), विजय पाटील (जळगाव), व्ही.बी. पाटील (कोल्हापूूर), सागर काकडे (पुणे) व ललित चव्हाण (सातारा) तर भाजपा समर्थित सहकार पॅनलचे आमदार बाळासाहेब सानप (नाशिक) व माजी आमदार वसंत गिते (नाशिक) यांचा समावेश आहे. कार्पोरेशनचे सर्वाधिक चार संचालक मराठवाड्यात आहेत. पुणे तीन, नाशिक तीन, मुंबई, कोकण, अमरावती व नागपूर विभागाला प्रत्येकी दोन संचालक आहेत. अविरोध सात पैकी पाच संचालक प्रगती पॅनलचे आहेत.