महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 07:27 PM2017-10-07T19:27:18+5:302017-10-07T19:27:26+5:30
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङमय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
मुंबई, – महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७ च्या नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङमय पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. सन २०१७ चा कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार जेष्ठ साहित्यिक रतिलाल बोरीसागर यांना घोषित झाला असून साहित्य पुरस्कार साहित्यिक आबिद सुरती,कला पुरस्कार श्री.गौतम जोशी, पत्रकारिता पुरस्कार श्री.शिरीष मेहता व संस्था पुरस्कार भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांना घोषित झाला आहे.
१० ऑक्टोबर, २०१७ रोजी सायंकाळी ७.०० वाजता गिरगांव चौपाटी येथील भारतीय विद्याभवन येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री.विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सोहळ्यास उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई,डॉ.जे.जे.रावल, खासदार श्री.अरविंद सावंत,आमदार श्री.मंगलप्रभात लोढा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणा-या वाङमय पुरस्कारामध्ये चुनीलाल मडिया पुरस्कार (नवलकथा) प्रथम पुरस्कार श्रीमती वर्षा अडालजा आणि श्रीमती सोनल परीख यांना संयुक्तरित्या घोषित करण्यात आला आहे. तर व्दितीय पुरस्कार श्रीमती मालती कापडिया यांना जाहीर झाला आहे. नाटक विभागात देण्यात येणारा प्रबोध जोशी पुरस्कार श्री.उत्तम गडा यांना घोषित झाला आहे. तर निबंध विभागातील वाडिलाल डगली पुरस्कार श्री.दिपक मेहता आणि श्रीमती तारिणीबहेन देसाई यांना संयुक्तरित्या घोषित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी अन्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.