राज्याला पुन्हा वळवाचा तडाखा, गारपीट, वादळी वाऱ्याने पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 06:49 AM2023-04-08T06:49:54+5:302023-04-08T06:50:08+5:30
पुढील दाेन दिवस पावसाचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वादळी वारा व विजांच्या कडकडाटात शुक्रवारी झालेल्या वळवाच्या पावसाने राज्याला झोडपले असून वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. राज्यात ३५ जनावरे दगावले असून आंबा, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान आणि पशुधन दगावल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत नाही तोच पुन्हा वादळी वाऱ्याने उरली-सुरली पिके मातीत गेली आहेत.
शुक्रवारी सकाळपासून राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटात अनेक भागांत गारपीट आणि जोरदार पाऊस झाला.
भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू- बुलढाण्यातील काटेल धाम (ता. संग्रामपूर) येथे भिंत कोसळून कृष्णाली बोरकर या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.
विदर्भात मोठे नुकसान- पश्चिम विदर्भात वादळी वाऱ्यामुळे भाजीपाला, फळपिके व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू- वीज पडल्याने बुलढाण्यातील चितोडा (ता. खामगाव) येथे गोपाल महादेव कवळे (वय ४०), कोल्हापुरात मौजे रेठरे (ता. शाहूवाडी) येथे बाबूराब दादू जाधव (६१) यांचा मृत्यू झाला.
आंब्याचे नुकसान- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. सांगलीतील शिराळा तालुका, कोल्हापूरमधील करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुका, सातारा जिल्ह्यात अनेक भागांत पावसाची हजेरी होती.
राज्यात ३५ जनावरे ठार- अकोल्यातील माझोड येथे गारांच्या तडाख्याने दहा शेळ्या दगावल्या. यात पळशी खुर्द (ता. खामगाव, जि. बुलढाणा) येथे आठ शेळ्या, सोंडी (ता. सेलू, जि. वर्धा) येथे बैल, पेढी आणि संगम (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथे एक गाय, दोन बैल ठार झाले.