महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षा १९ जानेवारीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 06:42 PM2019-11-07T18:42:00+5:302019-11-07T18:47:22+5:30
विद्यार्थ्यांना येत्या ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत..
पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी-२०१९ ) वेळापत्रक प्रसिध्द झाले असून येत्या १९ जानेवारी २०२० रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने परीक्षा अर्ज भरता येणार आहेत, असे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया काही वर्षांपासून रखडली होती. परिणामी डी.एड्., बी.एड्.पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सुमारे ९० टक्क्यांनी घट झाली. तसेच टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच होती.मात्र,चालू शैक्षणिक वर्षात राज्य शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुमारे ५ हजार शिक्षकांची भरती केली.भरती प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शास्वती वाटू लागली आहे.यामुळे यंदा टीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल,अशी शक्यता परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
दत्तात्रय जगताप म्हणाले,इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापन,सर्व परीक्षा मंडळ ,सर्व माध्यम ,अनुदानित,विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेतर्फे जानेवारी २०२० मध्ये घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी ८ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांकडून नलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत.तसेच १९ जानेवारी रोजी सकाळीच्या सत्रात व दुपारच्या सत्रात टीईटी परीक्षेचा पहिला व दुसरा पेपर घेतला जाईल.
--------------
मागील टीईटी परीक्षेस १ लाख ७३ हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. मात्र, यंदा पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू झाली. त्यामुळे टीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल.जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षेस सुमारे अडीच लाखापर्यंत विद्यार्थी बसण्याची शक्यता आहे.
- दत्तात्रय जगताप,अध्यक्ष,परीक्षा परिषद,महाराष्ट्र राज्य
------
टीईटी परीक्षेचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी : ८ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर
प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिट काढण्याचा कालावधी : ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२०
टीईटी परीक्षा, पेपर क्रमांक - १ : सकाळी १०.३० ते १.०० (१९ जानेवारी)
टीईटी परीक्षा, पेपर क्रमांक - २ : दुपारी २ ते ४.३० (१९ जानेवारी)
-------------------------