कोरोना नियमांच्या उल्लंघनाचे गुन्हे मागे घेणार: वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:35 AM2022-03-30T07:35:01+5:302022-03-30T07:36:19+5:30

कोरोनाचे निर्बंध लागू करताना आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीतील निर्बंध वेळोवेळी शिथिलदेखील करण्यात आले होते.

Maharashtra to withdraw cases registered for violation of Covid-19 curbs | कोरोना नियमांच्या उल्लंघनाचे गुन्हे मागे घेणार: वळसे-पाटील

कोरोना नियमांच्या उल्लंघनाचे गुन्हे मागे घेणार: वळसे-पाटील

googlenewsNext

मुंबई : कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांना मंगळवारी दिली. 

कोरोनाचे निर्बंध लागू करताना आपत्ती व्यवस्थापन विभागाने नियमावली जाहीर केली होती. या नियमावलीतील निर्बंध वेळोवेळी शिथिलदेखील करण्यात आले होते. तथापि, निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यात अनेक ठिकाणी गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. विवाह वा अन्य समारंभांच्या आयोजनासाठीच्या नियमांची पायमल्ली, गर्दीचे नियम तोडणे यासह कोरोना नियमांच्या उल्लंघनाबद्दल हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. भादंविच्या कलम १८८ नुसार ही कारवाई करण्यात आली होती. 

वळसे-पाटील यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागातर्फे आणला जाईल. हे गुन्हे दाखल असल्याने सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना पासपोर्ट बनविण्यात अडचणी येत आहेत. त्यांना यामुळे दिलासा मिळेल.

बैलगाडा शर्यतीतील गुन्हेही मागे घेणार
बैलगाडा शर्यतींना मनाई असताना बऱ्याच ठिकाणी या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीचे आयोजक व इतर लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तथापि, डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्यात आली आहे. तथापि, त्यापूर्वी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
    - दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री 

Web Title: Maharashtra to withdraw cases registered for violation of Covid-19 curbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.