पंचायत राज संस्थांच्या सक्षमीकरणात महाराष्ट्र आघाडीवर - राज्यपाल
By admin | Published: March 21, 2016 03:08 AM2016-03-21T03:08:30+5:302016-03-21T03:08:30+5:30
पंचायतराज संस्था अधिक सक्षम आणि बळकट करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता ७३व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना
मुंबई : पंचायतराज संस्था अधिक सक्षम आणि बळकट करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. आता ७३व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज संस्थांना विविध अधिकार बहाल करून त्यांना अधिक स्वयंपूर्ण आणि सक्षम करावे, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले.
यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायतराज संस्था, गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा रविवारी राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती
सभापती, सरपंच, अधिकारी उपस्थित होते.
राज्याचा अर्थसंकल्पही कृषी आणि ग्रामविकासाला चालना देणारा आहे. दुष्काळमुक्तीसाठी ‘जलयुक्त शिवार’ योजनेत सर्वांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी आतापर्यंत विविध योजना आखूनही गावांचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. हे चित्र बदलण्यासाठी नियोजनबद्ध विकास करणे गरजेचे आहे. यासाठी गावांनी पुढील पाच वर्षांचे विकास आराखडे तयार करून नियोजनबद्ध विकासाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. (प्रतिनिधी)यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोल्हापूर, लातूर व अहमदनगर या जिल्हा परिषदांना अनुक्रमे पहिले तीन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले, तसेच ब्रह्मपुरी (जि.चंद्रपूर), कराड (जि. सातारा) या पंचायत समित्यांना अनुक्रमे पहिले दोन, तर राहुरी (जि. अहमदनगर) व मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना तिसरा पुरस्कार विभागून देण्यात आला. महालगाव (ता. कामठी, जि. नागपूर), लोणी बु. (ता. राहाता, जि. अहमदनगर), कसबा उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम तीन पारितोषिके प्रदान करण्यात आली. एकूण २ कोटी ७० लाख इतक्या रकमेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.