गुंतवणूकदारांच्या पसंतीस महाराष्ट्रच अव्वल
By Admin | Published: December 31, 2015 04:20 AM2015-12-31T04:20:00+5:302015-12-31T04:20:00+5:30
आपल्या राज्यातील गुंतवणूक धोरण, पायाभूत सुविधा उत्कृष्ट असल्याचे सांगत आपलेच राज्य गुंतवणुकीसाठी अव्वल असल्याचे दावे विविध राज्यांकडून होत असतात. पण उद्योगांची शिखर संस्था
मुंबई : आपल्या राज्यातील गुंतवणूक धोरण, पायाभूत सुविधा उत्कृष्ट असल्याचे सांगत आपलेच राज्य गुंतवणुकीसाठी अव्वल असल्याचे दावे विविध राज्यांकडून होत असतात. पण उद्योगांची शिखर संस्था असलेल्या ‘असोचेम’ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून गुंतवणूकदारांच्या पसंतिक्रमात महाराष्ट्रच अव्वल असल्याचे दिसून आले आहे.
विविध राज्यांतील गुंतवणुकीचे तुलनात्मक विश्लेषण या विषयावर २१ राज्यांतील गुंतवणुकीचे चित्र, स्थिती आणि कल यांचा वेध घेत असोचेमने एक अहवाल तयार केला आहे. २००९ ते २०१४ या कालावधीतील गुंतवणुकीच्या स्थितीचा आढावा या अहवालात घेण्यात आला असून देशी व विदेशी अशा सर्व गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रालाच पहिली पसंती दिल्याचे दिसून आले आहे. तर दुसऱ्या स्थानावर गुजरातचा क्रमांक होता आणि तिसऱ्या स्थानावर ओडिशा राज्य राहिले. देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एक चतुर्थांश गुंतवणूक ही केवळ महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा अशा तीन राज्यांत झाली असल्याचे दिसून आले. यावरून त्या तीन राज्यांना असलेली मागणी आणि या राज्यांतील उद्योगाचे स्थान अधोरेखित होते, असे मत असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी व्यक्त केले.
या अहवालाच्या आधारे, डिसेंबर २०१४ च्या अखेरीस देशातील विविध राज्यांत झालेल्या गुंतवणुकीच्या आकडेवारीच्या अनुषंगाने सांगायचे झाल्यास, देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी १० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे. सुमारे १५ लाख कोटी रुपयांची ही गुंतवणूक आहे. तर महाराष्ट्राशी तगडी स्पर्धा करत ९.२ टक्क्यांच्या गुंतवणुकीसह गुजरातने दुसरा क्रमांक गाठला आहे. गुंतवणुकीत साडेसात टक्क्यांच्या हिश्शासह ओडिशा तिसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक ६.८ टक्के, तामिळनाडू ६.५ टक्के अशी क्रमवारी राहिली आहे.
देशातील २१ राज्यांत जी एकूण गुंतवणूक झाली त्यापैकी ८४.५ लाख कोटी रुपये गुंतवणूक ही खासगी उद्योगांकडून झाली. टक्केवारीत हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. २००९ ते २०१४ या कालावधीत प्रत्येक वर्षी गुंतवणुकीच्या प्रमाणात सरासरी ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते.