राज्यात पशुवैद्यकीय प्रवेशाचा पुन्हा श्रीगणेशा, ‘नीट’च्या नव्या गुणपत्रिकेचा आधार
By अविनाश कोळी | Published: August 1, 2024 01:20 PM2024-08-01T13:20:21+5:302024-08-01T13:21:19+5:30
१४ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी
अविनाश कोळी
सांगली : ‘नीट’ ची सुधारित रँकिंग जाहीर होण्यापूर्वीच घाई गडबडीत राज्यातील पशुवैद्यकीय प्रवेश रेटण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळावर ‘लोकमत’ ने प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल घेत आता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे आता नव्या गुणपत्रिकेच्या आधारावर नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
नीट परीक्षेसंदर्भात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असतानाही महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया घाईघाईने राबविण्यात आली. यासाठी २५ जून ते ७ जुलैदरम्यान पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याचवेळी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत १,५६३ विद्यार्थ्यांची नीटची फेर परीक्षा घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल ३० जून रोजी जाहीर केला. या निकालानंतर प्रत्येक विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक बदलली.
पशुवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी ही नव्याने आलेली गुणपत्रिका ग्राह्य धरणे अपेक्षित होते. पण असे न होता महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे जुनेच गुण आणि ऑल इंडिया रँक ग्राह्य धरून दि.१८ जुलै रोजी पशुवैद्यकीय प्रवेशासाठीची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली होती. फेर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचे विद्यार्थी नसल्याने याचा फारसा परिणाम गुणवत्ता यादीवर झाला नव्हता, मात्र, दि.२३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार भौतिकशास्त्र विषयाच्या एका वादग्रस्त प्रश्नाचे ग्राह्य धरलेले दोन पर्याय रद्द करून नवीन निकालानुसार एकच पर्याय बरोबर असल्याचे ग्राह्य धरण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची रँक बदलली. गुणांमध्येही बदल झाले.
पशुवैद्यकीय प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणल्यानंतर रँक बदलल्याने विद्यार्थ्यांना गोंधळ निर्माण झाला. ही बाब ‘लोकमत’ने मांडली. त्यानुसार आता महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.
१४ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी
पशुवैद्यकीय प्रवेशाकरिता पूर्वीच्या वेळापत्रकानुसार अंतिम गुणवत्ता यादीची तारीख ३१ जुलै होती. ती आता १४ ऑगस्ट करण्यात आली आहे. एनटीएकडून विद्यार्थ्यांचे नवे गुणपत्रक घेऊन ही प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.