Maharashtra Unlock: मोठी घोषणा; ११ जिल्हे वगळता राज्यातील निर्बंध शिथील, संपूर्ण नियमावली वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 07:50 PM2021-08-02T19:50:29+5:302021-08-02T19:51:43+5:30
Maharashtra Unlock: राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता आस्थापनं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
Maharashtra Unlock: राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता आस्थापनं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवारी आस्थापनं दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी मात्र निर्भंध कायम असणार आहेत.
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये मात्र तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये याआधीचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन ठिकाणी सध्या लागू असलेल्या निर्बंधांमध्ये मोकळीक द्यायची की नाही याचा निर्णय संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतला जाईल, असं सरकारनं जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूण १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
नेमकं काय सुरू राहणार?
>> अत्यावश्यक आणि इतर सर्व दुकानं, शॉपिंग मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रविवारी अत्यावश्यक दुकानं वगळता इतर सर्व आस्थापनं बंद राहणार आहेत.
>> व्यायाम, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी सार्वजनिक बाग आणि खेळाची मैदानं सुरू होणार आहेत.
>> शासकीय आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं पण कोरोना संबंधिचे सर्व नियम पाळून कर्मचाऱ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन शिफ्टचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
>> जीम, योगा सेंटर, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा एसी सुरू न ठेवता एकूण ५० टक्क्यांच्या क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहे.
>> रेस्टॉरंट्स एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनं दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
>> चित्रपटगृह, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील
>> सर्व धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.