Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरे विधानभवनात पोहोचले, पण शिवसेना आमदार अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:26 AM2022-06-20T10:26:27+5:302022-06-20T10:27:30+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election Update: सकाळपासून ६८ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाच्या आमदारांच्या चारही बस विधानभवनात पोहोचल्या आहेत.
मुंबई - विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज सोमवारी होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. सकाळपासून ६८ आमदारांनी मतदान केले आहे. भाजपाच्या आमदारांच्या चारही बस विधानभवनात पोहोचल्या आहेत. असे असताना शिवसेनेच्या आमदारांची बस मात्र अद्याप आलेली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही वेळापूर्वीच विधानभवनात पोहोचले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे आमदारही विधानभवनात पोहोचले होते. परंतू शिवसेना आमदार, मंत्र्यांची बस सी लिंकजवळ वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. यामुळे त्यांना येण्यास उशिर झाला आहे.
शिवसेनेने आपली मते काँग्रेसकडे वळविली...
शेरास सव्वाशेर मिळतोच’ असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देत राज्यसभा निवडणुकीचा बदला घेणार असे जणू आव्हानच दिले आहे. तर, महाविकास आघाडीचा धर्म पाळत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे हात मजबूत केले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा 1 वाजता काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांना फोन करुन अधिकची मतं काँग्रेसला देणार असल्याचं म्हटलंय. शिवसेनेकडे असलेली अधिकची 4 ते 5 मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेकडे एकूण 55 आमदार आहेत, तर विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनच्या 2 उमेदवारांना प्रत्येकी 26 मतं आवश्यक आहेत. मात्र, त्या उमेदवारांना आवश्यक मतांपेक्षा 2 मतं जास्त देण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. म्हणजेच 28 प्लस 28 एकूण 56 मतं शिवसेनेचे स्वत:च्या उमेदवारांना मिळणार आहेत. त्यात एक अपक्ष आमदाराचं मत असेल. त्यामुळे, शिवसेनेकडे अपक्षांची अतिरिक्त असेलली मतं शिवसेना काँग्रेसला देणार आहे. शिवसेनेसोबत 7 अपक्ष आमदार आहेत, त्यांपैकी उर्वरीत मतं काँग्रेसला देण्यात येणार आहेत.