Vidhan Parishad Election: अटकेची भीती, तरीही रवी राणा विधान भवनात पोहोचले; म्हणाले, 'शिवसेना हरणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:10 PM2022-06-20T13:10:46+5:302022-06-20T13:17:17+5:30
Maharashtra Vidhan Parishad Election: राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी रवी राणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावतीचे पोलीस मला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला येतात, मला थांबविण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी मतदान करू नये म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. राज्यसभेला शिवसेनेचा उमेदवार पडला, राऊत म्हणाले रवी राणा आमच्या पायाशी असे बोललेत, त्यांनी लक्षात ठेवावे, जनता उद्धव ठाकरेंना धडा शिकवेल, असा इशारा दिला.
मी दोन दिवस मुंबई बाहेर होतो. पोलिसांचा वापर करून मला अटक करण्यात आली असती, मला रोखले गेले असते. म्हणून मी आता आलो आहे. विधान परिषदेसाठी मतदान करणार आहे. राज्यसभेसारखेच मी आताही मतदान करून निघणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीनुसार मतदान करणआर आहे, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले.
हनुमान चालिसा घेऊन जाणे म्हणजे मी कोणताही गुन्हा करत नाही, जर हा गुन्हा आहे तर मी गुन्हा करत आहे. अमरावतीला माझ्या घरी पोलीस पाठवले माझ्यावर दबाव टाकण्यासाठी, मला थांबवण्यासाठी किंवा आघाडीला मतदान द्यावे यासाठी हे सर्व केले आहे. मला माहित होतं कुठल्याही क्षणी मला अटक केली असती. आता थेट मतदानासाठी आलो आहे. हनुमान चालिसा मी आतमध्ये घेऊन जाणार आहे, असे रवी राणा म्हणाले.
रवी राणा अटक वॉरंट निघाल्याने विधान परिषदेला मतदान करण्यासाठी येणार की नाहीत हे गुलदस्त्यात होते. बाहेर आले तर पोलीस अटक करतील आणि मतदानापासून वंचित ठेवतील अशी शक्यता होती. अखेर रवी राणा विधान परिषदेत दाखल झाले आहेत.
राणा यांनी काय आरोप केलेले?
राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत, असे रवी राणा यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमरावती महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा हटवला होता. यामुळे संतप्त झालेल्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील राजापेठ येथे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकून त्यांचा निषेध केला होता. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी आमदार राणांविरुद्ध कलम ३०७ आणि कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.