Vidhan Sabha 2019: भाजपची पहिली यादी जाहीर; 'या' दिग्गजांना वगळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 01:51 PM2019-10-01T13:51:40+5:302019-10-01T13:54:21+5:30
बड्या नेत्यांना वगळल्यानं आश्चर्य व्यक्त
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं १२५ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह दिग्गजांचा समावेश आहे. मात्र या यादीत अनेक महत्त्वाच्या नेत्यांची नावं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील काही आजी-माजी मंत्र्यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा पहिल्या यादीत समावेश नाही. भाजपनं प्रसिद्ध केलेल्या पहिल्या यादीत खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघाचं नाव नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत त्यांना स्थान दिलं जाणार की त्यांचं तिकीट कापण्यात येणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. खडसेंवर आरोप झाल्यानं त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पक्षापासूनदेखील दूर गेले.
माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचीही स्थिती खडसेंसारखीच आहे. २०१४ मध्ये मेहता घाटकोपर पूर्व मतदारसंघातून निवडून आले. मात्र पहिल्या यादीत त्यांना स्थान देण्यात आलेलं नाही. गृहनिर्माण मंत्री म्हणून प्रकाश मेहता वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपच्या पहिल्या यादीत घाटकोपर पूर्व मतदारसंघाचा समावेश नाही. त्यामुळे दुसऱ्या यादीत तरी त्यांना स्थान मिळणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नावाचादेखील पहिल्या यादीत समावेश नाही. यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे. तावडे २०१४ मध्ये बोरिवलीतून निवडून आले होते. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत बोरिवलीचा समावेश नाही. याशिवाय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचादेखील पहिल्या यादीत समावेश नाही. ते २००४, २००९ आणि २०१४ मध्ये चंद्रपूरमधील कामठी मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र त्यांच्या मतदारसंघाचा पहिल्या यादीत समावेश नाही. याशिवाय पहिल्या यादीत वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, कुलाब्याचे आमदार राज पुरोहित, मुलुंडचे आमदार सरदार तारासिंह यांचाही समावेश नाही.