Vidhan Sabha 2019: निवडणुकीच्या तोंडावर तुटणार युती? भाजपनं आखली नवी रणनिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 04:23 AM2019-09-26T04:23:42+5:302019-09-26T06:49:24+5:30
युतीचा तिढा सुटेना; मुख्यमंत्री आज दिल्लीला जाणार, नेत्यांना देणार फिडबॅक
- यदु जोशी
मुंबई : युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून २८८ मतदारसंघांसाठी उमेदवारांची यादी तयार केली आहे. या यादीला पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गुरुवारी दिल्लीला जात आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काल रात्री मॅरेथॉन बैठकी झाल्या. प्रत्येक विभागातील दोन प्रमुख नेते, संघटक यांना बोलावून एकेक संभाव्य उमेदवाराचे नाव त्यांच्याकडून कोअर कमिटीने घेतले. जवळपास ८० टक्के जागांवर एकच नाव पक्षसंघटनेकडून देण्यात आले. २० टक्के जागा अशा आहेत की ज्यावर दोन नावे देण्यात आली. पक्षाने घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, उमेदवारांबाबतचे सर्व्हे, स्थानिक जातीय समीकरणे, विरोधी पक्षाच्या तगड्या संभाव्य उमदेवारांची नावे अशा विविध निकषांवर पक्षसंघटनेकडून निश्चित करण्यात आलेली नावे यावेळी कोअर कमिटीला देण्यात आली.
ज्या मतदारसंघांमध्ये एकपेक्षा अधिक नावे कोअर कमिटीला देण्यात आली त्या जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते, जिल्हाध्यक्ष आणि संघाच्या प्रमुखांची पसंती कोणत्या नावाला आहे याचा फीडबॅक तातडीने मागवण्यात आला. हा फीडबॅक आज आला. ‘युती होणार हे निश्चित पण आम्ही सर्वच मतदारसंघांमधील उमेदवार निश्चित केले. ज्या जागा भाजपच्या वाट्याला युतीमध्ये येतील त्यामधील उमेदवारांची नावे जाहीर केली जातील’, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले. ऐनवेळी युती तुटलीच तर धावपळ नको म्हणूनही भाजपने सर्व उमेदवारांची नावे तयार ठेवली आहेत, पण तशी वेळ येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
दोघांनाही हवे महायुतीचेच सरकार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी मुंबईतील कार्यक्रमात बुधवारी एकाच मंचावर आले होते.
माथाडी कामगारांच्या मेळाव्यात या दोन्ही नेत्यांचा एकाच शालीद्वारे सत्कार केला. राज्यात महायुतीचेच सरकार येणार हे त्यांनी ठासून सांगितले. मात्र, युतीत किमान सात जागांवरुन जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. -