Vidhan Sabha 2019: भाजपला आता ‘चले जाव’ करा- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 04:18 AM2019-09-22T04:18:32+5:302019-09-22T06:29:36+5:30
नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा
अहमदनगर : महाराष्ट्र योग्य दिशेने चालला तर देश योग्य दिशेने जातो हा आजवरचा इतिहास आहे़ विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने आता संघर्षाला प्रारंभ झाला आहे़ इंग्रजांविरोधात याच नगरच्या किल्ल्यातून क्रांतीची सुरुवात झाली होती़ आजही तशीच परिस्थिती असून आता भाजपाला ‘चले जाव’ करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोेजित मेळाव्यात पवार बोलत होते. पवार म्हणाले, युती सरकारच्या काळात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ मी कृषीमंत्री होतो तेव्हा शेतकऱ्यांसाठी सरसकट ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. देशाचे गृहमंत्री म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार नाहीत. हेच सरकार मात्र बँकांच्या मजबुतीकरणासाठी ८७ हजार कोटी रुपये देत आहे़ आमच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात कारखाने उभे राहिले. यंदा नगर जिल्ह्यातील कारखाने दोन महिनेही चालणार नाही अशी परिस्थिती आहे़ या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील कारखाने बंद पडून लाखो बेरोजगार झाले आहेत. यंदा महाराष्ट्रात दुष्काळ आणि पूर असे दुहेरी संकट ओढावले, अशा परिस्थितीत राज्याच्या प्रमुखाने जनतेला धीर द्यायचा असतो. मुख्यमंत्री मात्र राज्यात महाजनादेश यात्रा काढतात. मी आज सत्तेत नाही तरीही सत्ताधारी झोपेतही ‘पवार पवार’ असे चावळत आहेत.
जगताप-कळमकर यांच्यात वाद
आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या समर्थकांमध्ये मेळाव्यात वाद झाले. पवार निघून गेल्यानंतर आमदार जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की, शिविगाळ केल्याचा आरोप कळमकर यांनी केला आहे. कळमकर हे जगताप यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गेले, मात्र ज्येष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याने हा वाद अखेर निवळला. महापालिकेत भाजपला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून जगताप-कळमकर यांच्यात वाद आहेत.
लफडी केली तर इडी अन् येडी मागे लागणारच
आमच्या संस्थेची चौकशी सुरू झाली आहे, आम्हाला नोटीस आली आहे आणि आता आम्हाला विकास करायचा आहे़ अशा सबबी सांगून काही जण पक्षातून बाहेर पडले़ यांनी नको ती लफडी केली म्हणूनच ईडी अन् येडी यांच्या मागे लागली आहे़ काही जण १४ वर्षे मंत्री होते तेव्हा त्यांना विकास करायचे सुचले नाही का? असा उपरोधिक टोला पवार यांनी पक्षांतर करणाºयांना लगावला.