Vidhan Sabha 2019 : ईडीच्या नोटिसांद्वारे राष्ट्रवादी नेत्यांना धमकी- शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:38 AM2019-09-17T04:38:30+5:302019-09-17T04:39:29+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- ईडीची नोटीस दाखवून माझ्या काही सहकाऱ्यांना धमकावण्यात आले.
नाशिक: ईडीची नोटीस दाखवून माझ्या काही सहकाऱ्यांना धमकावण्यात आले. मी नावं उघड करणार नाही मात्र आमच्यातून गेलेल्या काहीजणांनी हे सांगितलं, असा दावा राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. उदयनराजेंच्या आरोपांवर मला काहीही बोलायचे नाही. त्यांना १५ वर्षांनंतर हे आरोप सुचले का?, इतकाच माझा प्रश्न आहे, असा टोलाही पवारांनी लगावला.
ते म्हणाले, आपण संसदीय कारकिर्दीच्या ५२ वर्षांपैकी २७ वर्षे विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षात असलो की समाधान मिळते, कारण सत्तेत असल्यावर आपण काय निर्णय घेतले व त्याची अंमलबजावणी झाली किंवा नाही हे कळत नाही. उदयनराजे भोसले यांनी पंधरा वर्षे राष्टÑवादीत वाया गेल्याची टीका केली आहे. यावर राष्ट्रवादीत अन्याय झाल्याचे समज यायला राजेंना पंधरा वर्षे लागली, अशी मिश्कील टिप्पणी पवारांनी केली. विधानसभा निवडणुकीत उद्योग-धंद्यांची मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कांदा आयात आदी प्रश्नांवर लढविली जाणार असून, नोटबंदीचे परिणाम आता दिसू लागले असल्याचेही पवार यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षातील मेगाभरतीबाबत बोलताना पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
>भुजबळ मुंबईतच
नाशिकच्या बैठकीत छगन भुजबळ गैरहजर असल्याबाबत शरद पवार यांना विचारणा केली असता, पवार म्हणाले, मुंबईत कॉँग्रेसबरोबर राष्ट्रवादीची बैठक सुरू असून, त्यात भुजबळ व पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. नाशिकच्या बैठकीबाबत दोन दिवसांपूर्वीच आमची चर्चा झाली. त्यांनीच माझ्या दौºयाचा कार्यक्रम निश्चित करून दिला. मीच त्यांना मुंबईच्या बैठकीत थांबण्यास सांगितले.