Vidhan Sabha 2019: 'राज्यात भाजपचे सरकार, फडणवीस हेच मुख्यमंत्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:27 AM2019-09-23T04:27:46+5:302019-09-23T06:45:37+5:30
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची घोषणा; जागांवर अडलेल्या शिवसेनेला दिला इशारा
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे भाजप सरकार येणार असून, देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी करत प्रचाराचे रणशिंग फुंकले. युतीचे जागावाटप आणि शिवसेनेचा नामोल्लेखही त्यांनी टाळला. त्यामुळे शहा यांचे हे भाषण शिवसेनेला इशारा असल्याचे मानले जात आहे.
गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित कार्यक्रमात अमित शहा यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. ही भूमिका मांडताना राज्यात भाजपला पूर्ण बहुमताने निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. शहा यांनी आपल्या ३४ मिनिटांच्या या भाषणात शिवसेनेचे नावही घेतले नाही.
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी होणाºया या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शहा यांच्या या दौºयातच युतीची घोषणा होणार, शहा मातोश्रीवर जाणार, अशी चर्चा होती, परंतु आपल्या पाऊण तासाच्या भाषणात शहा यांनी जागावाटप आणि शिवसेनेबाबत चकार शब्दही काढला नाही. उलट राज्यात भाजप पूर्ण बहुमताचे सरकार बनवेल आणि देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे ठणकावून सांगितले.
काश्मीरमध्ये ३७० कलम लागू केल्यापासून या कलमामुळे ४० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरातून आता दहशतवाद हद्दपार होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडणारे शरद पवार यांनी हे कान उघडून ऐकावे असा टोलाही त्यांनी लगावला. कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुम्ही विरोध करता की समर्थन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकांना स्पष्ट सांगावे असे आवाहन शहा यांनी यावेळी केले.
बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता. अशा मुद्यांमध्ये राजकारण आणता कामा नये. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कलम ३७० हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणले अशीही टीका शहा यांनी केली.