Vidhan Sabha 2019: 'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार!'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 03:33 AM2019-09-26T03:33:16+5:302019-09-26T03:33:53+5:30

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास; माथाडी कामगारांच्या मेळाव्यात दिले युतीचे संकेत

Maharashtra Vidhan Sabha 2019 May again the power of Mahayuti will come in the state! | Vidhan Sabha 2019: 'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार!'

Vidhan Sabha 2019: 'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार!'

Next

नवी मुंबई : राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून युतीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त बुधवारी तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्या वेळी बोलताना त्यांनी युतीचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. माथाडी कायदा हा देशातील एकमेव कायदा आहे, ज्यामध्ये अंगमेहनत करणाऱ्या कामगारांना संरक्षण देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशाच्या व राज्याच्या कामगारांना किती संरक्षण आहे यावर त्या देशाचे किंवा राज्याच्या विकासाचे मोजमाप होते. एपीएमसीसारख्या बाजारपेठांमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला व देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली. माथाडी कायदा संपूर्ण देशात लागू करण्याचा मानस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीचे सरकार नेहमीच माथाडी कामगारांच्या पाठीशी राहिले असून भविष्यातदेखील महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही सुडाने वागलो नाही आणि वागणारही नाही. चळवळीच्या मध्ये येण्याचे पाप आम्ही केले नाही. आता तुम्ही सोबत आलेलेच आहात, जे भगवा हाती घेत आहेत त्यांचे स्वागतच आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. माथाडी कामगारांनो नुसते अपेक्षांचे ओझे वाहू नका. तुमच्या कष्टाला न्याय मिळण्यासाठी तुमच्या रक्ताचे आणि हक्काचे सरकार आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी उपस्थित माथाडी कामगारांना केले.

माथाडींच्या बाबतीत जे प्रश्न मांडले जातील ते सर्व प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. मागण्यांसाठी करावा लागणारा संघर्ष मी पाहिला आहे. माथाडींसाठी हक्काची घरे आणि किमान वेतन कसे मिळेल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचेही भाषण झाले. माथाडी कामगारांच्या चळवळीला अण्णासाहेबांची चळवळ राहू द्या; त्यामध्ये कोठेही फूट पाडू नका, अशी मागणी या वेळी शिंदे यांनी केली. माथाडी नेते तथा अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमाला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजन विचारे, महापौर जयवंत सुतार, सिडकोचे संचालक प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, मिलिंद नार्वेकर, सुभाष भोईर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार शिवेंद्रराजे भोसले, संदीप नाईक, प्रसाद लाड, रामचंद्र घरत आदी उपस्थित होते.

गणेश नाईक यांची अनुपस्थिती
अलीकडेच भाजपत दाखल झालेले राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री गणेश नाईक यांनी या कार्यक्रमाला दांडी मारल्याने उपस्थितांत तर्कवितर्क लावले जात होते. ११ सप्टेंबर रोजी नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वाशी येथील भव्य कार्यक्रमात भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा बुधवारी पार पडलेला नवी मुंबईतील हा पहिलाच कार्यक्रम होता.

शिवाय या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. त्यामुळे या कार्यक्रमाला नाईक आवर्जून उपस्थित राहतील, असे आडाखे बांधले जात होते. मात्र, संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक यांना जायला सांगून स्वत: गणेश नाईक यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्याने राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे.

युतीची घोषणा करायची का? : सेना-भाजप युती फॉर्म्युल्याच्या गणितात अडकली असतानाच माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या देहबोलीवरून युती होणारच, असे संकेत कार्यकर्त्यांना मिळाले. उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानात काहीतरी पुटपुटले. ते युती घोषणा आत्ताच करायची का, याबाबत तर बोलत नसतील ना, अशीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली.

शरद पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईशी सरकारचा संबंध नाही : मुख्यमंत्री
शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही. १00 कोटींपेक्षा जास्त घोटाळा असेल तर ईडीला नोंद घ्यावी लागते. गैरव्यवहाराची तक्रार थेट ईडीकडे केली जाते. यात राज्य सरकारचा संबंध नाही. नियमाने कारवाई सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार शरद पवार यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दिवंगत माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित मेळाव्याला मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस व ठाकरे यांनी सानपाडा सेक्टर १७ येथे वडार समाज राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या राज्यातील वडार भवनाला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्यावरील कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 May again the power of Mahayuti will come in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.