Vidhan Sabha 2019 : नारायण राणेंचं ठरलं, भुजबळांचं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:46 AM2019-09-19T04:46:17+5:302019-09-19T04:46:47+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -खासदार नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार नारायण राणे यांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपला महाराष्टÑ स्वाभिमानी पक्षही ते भाजपात विलीन करणार आहेत. राणे खरोखरच भाजपात आले तर राष्टÑवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत जाणार का, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.
बऱ्याच दिवसांपासून नारायण राणे हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. शिवसेनेच्या विरोधामुळे राणेंचा भाजप प्रवेश लांबल्याचे सांगितले जात होते. स्वत: राणे यांनीच भाजपप्रवेशाची घोषणा मंगळवारी कणकवलीत केली. मात्र, त्यांचा प्रवेश कधी आणि कुठे होणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. तसेच राणेंच्या घोषणेला भाजपकडून कोणीही सकारात्मक उत्तर दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिला असून प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत होऊ शकतो, असा दावा राणे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राणे पिता-पुत्रांचा भाजपात प्रवेश झाला तर नीतेश राणे यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी द्यावी लागेल. शिवाय, शिवसेनेची नाराजीही ओढावून घ्यावी लागेल.
सध्या भाजप-शिवसेनेचे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. शिवसेनेच्या म्हणण्यानुसार फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला भाजप नेत्यांना मान्य नाही. भाजपच्या राज्य नेतृत्वाने १२० जागांचा प्रस्ताव पुढे केला आहे. तर केंद्रीय नेतृत्व ११५ च्यावर एकही जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे जागा वाटपाची बोलणी थांबली आहे. उद्या कदाचित जर युती झाली नाही, तर नारायण राणे यांच्या सारखा कोकणातील सक्षम नेता आपल्याकडे असावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी राणेंना जवळ केले असावे. तर दुसरीकडे,'राणे तुमचे तर, भुजबळ आमचे' अशी चर्चा शिवसेनेत सुरु झाली आहे.
छगन भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. भुजबळांच्या संभाव्य प्रवेशावरून शिवसेनच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांत दोन गट पडले. काहीनी विरोध केला तर काहीजण भुजबळांच्या स्वागतास तयार आहेत. परवा राष्टÑवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिक येथे राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला छगन भुजबळ गैरहजर होते. भुजबळांच्या अनुपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकारांनी याविषयी विचारले असता, पवार म्हणाले, मुंबईत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची जागा वाटपावर चर्चा आहे. त्याबैठकीला भुजबळ गेले आहेत. पवारांच्या या खुलाशानंतरही कार्यकर्त्यांच्या मनात पाल चुकचुकलीच.
शिवसेनेत भुजबळांना मानणारा एक गट आहे. या गटाच्या नेत्यांचे म्हणणे असे की, जर राणे भाजपात जाणार असतील, भुजबळांना सेनेत घेण्यास काहीच हरकत नसावी. राणेंच्या प्रवेशामुळे कोकणात भाजपची ताकत वाढू शकते. त्याला ‘काउंटर’ करण्यासाठी भुजबळांना शिवसेनेत घेतले गेले तर आश्चर्य वाटायला नको. शेवटी, राजकारणात काहीही घडू शकते, हेच खरे!