Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये भर पावसात शक्तिप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:41 AM2019-09-19T04:41:49+5:302019-09-19T04:42:07+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली.
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. भर पावसातही रोड शो आणि बाइक रॅलीच्या माध्यमातून फडणवीस यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. तर, मनसे व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर काळे फुगे सोडून यात्रेला विरोध नोंदविला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी नाशिक येथे पोहोचली आहे. सायंकाळी शहरातील पाथर्डी फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. सुमारे पाच हजार दुचाकीस्वार भाजपाचे झेंडे आणि ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले. सिडकोमार्गे मोटारसायकल रॅली गोल्फ क्लब येथे आल्यानंतर त्र्यंबक नाका येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू झाला. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सिडको परिसरातील विजयनगर चौकात युवतींचे लेझिम पथक आणि मºहाठमोळ्या पोषाखात सहभागी झालेल्या अश्वारूढ युवतींच्या पथकाने स्वागत केले, तर हनुमान मंदिर चौकात आदिवासी पथकाच्या चमूने पारंपरिक पद्धतीने फडणवीस यांचे स्वागत केले.
शहरातून निघालेली ही मिरवणूक पंचवटी कारंजा येथे जात असतांनाच जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ झाली पण रोड शो सुरूच ठेवण्यात आला होता. मनसे व राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रा मार्गावर हवेत काळे फुगे सोडून यात्रेस विरोध दर्शविला.
>तिघे जण ताब्यात
महाजनादेश यात्रा जीपीओ चौकात आली असता शिक्षणाच्या प्रश्नावर काही तरुणांनी मुख्यमंत्र्यांना फलक दाखविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेप्रसंगी काही संघटनांनी विरोध करण्याची भूमिका घेतल्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत शंभरपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना नोटिसा बजविल्या होत्या, तर काहींना ताब्यातही घेण्यात आले होते. तरी काळे फुगे सोडले गेले.
अन निष्ठावंत कुंपणाबाहेर
पाथर्डी फाट्यावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी मुख्यमंत्री येण्याच्या काही क्षण आधीच पालकमंत्री गिरीश महाजन दाखल झाले. त्यांचवेळी भाजपात नव्याने दाखल झालेले नेते घुसले. शिस्तीची परंपरा असलेले मूळ भाजपवाले पुतळ्याच्या कुंपणाबाहेरच राहिले. मुख्यमंत्री आल्यानंतरदेखील नवागतच त्या कुंपणाच्या आतमध्ये पोहोचले.