Vidhan Sabha 2019 : एमआयएम नसली तरी चिंता नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:48 AM2019-09-18T00:48:44+5:302019-09-18T00:49:06+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर युती राहील की नाही, हे अद्याप अनिर्णित आहे.
कल्याण : विधानसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर युती राहील की नाही, हे अद्याप अनिर्णित आहे. मात्र युती झाली नाही तरी, वंचित आघाडीला फारसा फरक पडणार नसल्याचा दावा वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी कल्याणमध्ये केले. महिला कार्यकारिणी गठीत करण्यासाठी त्यांनी मंगळवारी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळी लोकमतशी बोलताना एमआयएमच्या युतीबाबत त्यांनी भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे अध्यक्ष अकरूबुद्दीन ओवेसी यांची चांगली साथ लाभली. पण मुस्लिम समाजाचे मतविभाजन झाल्याने एमआयएमचे संघटन त्या निवडणुकीत दिसून आले नाही. त्या निवडणुकीत मोठा भार वंचित आघाडीनेच उचलला होता. त्यामुळे एमआयएमशी विधानसभा निवडणुकीत युती नाही झाली तरी, वंचितला फारसा फरक पडणार नाही, असे ठाकूर म्हणाल्या. महत्वाचे म्हणजे, मुस्लिम समाजात जे घटक आहेत, त्यांचा कल वंचित आघाडीकडे आहे. त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीच्या २८८ पैकी २५ उमेदवार मुस्लिम समाजातील असतील, हे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे. महिला आघाडीची कार्यकारिणी गठन करण्यासाठी ठिकठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत. सर्व समाजातील लोकांना आघाडीत घेतले जाणार आहे. उच्चशिक्षित आणि राजकीय समज असलेले कार्यकर्ते आघाडीत असावेत, यावर आमचा भर असून, या माध्यमातून लढाऊ राजकीय संघटन उभे करण्याचा आघाडीचा प्रयत्न असल्याचेही ठाकूर म्हणाल्या. यावेळी ठाकूर यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सदस्या रोहीणी ठेकळे होत्या. धर्मा वक्ते, रूपेश हुंबरे, प्रतिक साबळे, रविंद्र संगारे आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
>बाळासह उपस्थित
कल्याणमधील शासकीय विश्रामगृहात कार्यकारिणीसाठी शेकडोहून अधिक महिलांनी मुलाखती दिल्या. एकेकाळच्या काँग्रेसमधील ज्येष्ठ कार्यकर्त्या व सध्या वंचित आघाडीत असलेल्या शारदा बागुल यांनीही मुलाखत दिली. विशेष म्हणजे उल्हासनगरमधील प्रिया पेठारे या सात दिवसांच्या बाळाला घेऊन मुलाखतीसाठी आल्या होत्या.