Vidhan Sabha 2019 : ''विरोधी पहिलवान अंगाला तेल लावायलाच तयार नाहीत''
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:42 AM2019-09-17T04:42:58+5:302019-09-17T04:44:16+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- निवडणुकीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व पैलवानांना आम्ही चितपट केले आहे.
इस्लामपूर /क-हाड : राज्यातील पाच वर्षांच्या कामाचा लेखाजोखा ठेवून जनतेचा आशीर्वाद मागत आहोत. त्यामुळे विधानसभेचा निकाल ठरला आहे. निवडणुकीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व पैलवानांना आम्ही चितपट केले आहे. त्यांचा कोणीही पैलवान अंगाला तेल लावायला तयार नाही. त्यामुळे विधानभवनावर महायुतीचा भगवा फडकवणारच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथे महाजनादेश यात्रा आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी रथावरूनच संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, महाजनादेश यात्रेवर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, आम्ही जेव्हा विरोधात होतो, तेव्हा संघर्ष यात्रा काढली. आता सत्तेत आहोत, त्यामुळे जनतेशी संवाद साधण्यासाठी ही महाजनादेश यात्रा काढली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वातही यात्रा निघाली आहे. मात्र त्यांच्या भाषणालाच कोणी थांबत नाही. अमोल कोल्हेंना लोक बघायला येतात. आमच्या महाजनादेश यात्रेच्या सभांना मैदान पुरत नाही; तर
त्यांच्या सभेवेळी मंगल कार्यालयही भरत नाही. मात्र तरी ते सुधारलेले नाहीत.
विरोधकांचा पराभव होऊनही ते मान्य करत नाहीत. इव्हीएममुळे पराभव झाला, हे त्यांचे दुखणे आहे. जयंतराव, २००४ ते २०१४ पर्यंत तुम्ही प्रत्येक निवडणूक जिंकली. त्यावेळीही इव्हीएमच होते; मात्र आता मोदींनी सर्वच मैदान मारल्यानंतर विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडत आहेत.
सत्यजित देशमुख
यांचा भाजपात प्रवेश
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी सोमवारी कºहाड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
उदयनराजे मुक्त विद्यापीठ
उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करताना कॉलर उडवली नाही. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना शिस्त लागत आहे, असा टोला ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात लगावला आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांचा स्वतंत्र अभ्यासक्रम आहे. कुठं शिस्तीत वागायचं अन् कुठं मुक्त वागायचं, हे त्यांना चांगलं कळतं,’ असे ते म्हणाले. त्यावर तुम्ही त्यांना संघाच्या नियमानुसार शपथ घ्यायला लावणार काय? असा प्रश्न विचारताच ‘त्यांना काय अडचण नाही, तुम्हाला काय अडचण आहे का?’ असा सवाल त्यांनी केला.