Vidhan Sabha 2019: भाजप-शिवसेना युतीच्या घोषणेला पितृपक्षाचा अडसर!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:24 AM2019-09-23T04:24:11+5:302019-09-23T06:45:10+5:30
घटस्थापनेपर्यंत चालणार चर्चांचे गुऱ्हाळ; त्यानंतर साधला जाईल मुहूर्त
- गौरीशंकर घाळे / मनोहर कुंभेजकर
मुंबई : ‘आमचं सगळ काही ठरलंय’ असा दावा भाजप आणि शिवसेनेच्या शीर्षस्थ नेत्यांकडून केला जात असला, तरी युतीच्या घोषणेचा मुहूर्त मात्र पुढेच जात आहे. युतीच्या घोषणेला पितृपक्षाचा आणि संभाव्य बंडखोरीचा अडसर असल्याचे समजते. घटस्थापनेपर्यंत युतीच्या चर्चेचे गुºहाळ चालणार असे दिसते.
२९ सप्टेंबर रोजी घटस्थापना आहे. तत्पूर्वीचा पंधरवडा हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या काळात कोणत्याही नव्या कार्याची सुरुवात टाळण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. त्यामुळे युतीबाबतचे सोपस्कार आठवड्याभरात पूर्ण करून घटस्थापनेलाच घोषणा केली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, २०१४ साली घटस्थापनेच्या दिवशीच युती तुटली होती आणि शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे गेले होते. यावेळी मात्र एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, अशी युतीच्या नेत्यांची भूमिका आहे. जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून, तीन-चार दिवसांत सर्वच बाबी नक्की केल्या जातील. पितृपंधरवडा संपला की, घटस्थापनेचा मुहूर्त साधत युतीची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुहूर्त, पंचांगावर दोन्ही बाजूच्या नेत्यांचा विश्वास आहे. शिवाय, घोषणा करताना संख्याशास्त्राचाही विचार केला जाणार असल्याची शक्यताही सूत्रांनी वर्तविली.
त्यांना संधी मिळणार नाही
रविवारी अमित शाह मुंबई दौऱ्यावर होते. याच दौºयात युतीची घोषणा केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही.
४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची संधी आहे. घटस्थापनेला युतीची घोषणा केल्यानंतर पुढील दोन-चार दिवसांत टप्प्याटप्प्याने उमेदवारी याद्या जाहीर केल्या जातील. त्यामुळे ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांना टोकाचा निर्णय घेण्यास पुरेसा अवधी मिळणार नाही, असाही तर्क दिला जात आहे.