Vidhan sabha 2019 : राजकीय भाऊबंदकी; निवडणूक रिगणात उतरली भावंडं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 05:13 AM2019-10-03T05:13:56+5:302019-10-03T05:14:12+5:30
विधानसभा निवडणुकीत दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षातर्फे तर सख्खे भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे रिंगणात उतरले आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत दोन सख्खे भाऊ वेगवेगळ्या मतदारसंघात एकाच पक्षातर्फे तर सख्खे भाऊ-बहीण दोन वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या पक्षांतर्फे रिंगणात उतरले आहेत.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी भाजपचे शैलेश लाहोटी यांचा ४९४६५ मतांनी दारुण पराभव केला होता. काँग्रेसने अमित यांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. बाजूच्या लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसने अमित यांचे बंधू धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. धीरज हे राजकारणात आधीपासूनच सक्रिय असून लातूर जिल्हा परिषदेचे सदस्यदेखील आहेत. लातूर ग्रामीणमध्ये २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे त्रिंबक भिसे विजयी झाले होते. पक्षाने यावेळी त्यांच्याऐवजी धीरज यांना संधी दिली आहे. अमित आणि धीरज या दोन बंधुंच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशमुख घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
इगतपुरी (जि.नाशिक) येथील काँग्रेसच्या आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. आता त्या इगतपुरीतून शिवसेनेच्या उमेदवार आहेत. निर्मला या माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांच्या कन्या. माणिकराव हे नंदुरबारचे तब्बल नऊ वेळा खासदार होते. त्यांचे पुत्र भरत गावित यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपने त्यांना नवापूर विधानसा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे या भावंडांमध्ये पुन्हा एकदा चुरशीचा सामना रंगणार आहे.
खासदारांच्या पत्नी रिंगणात
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने वरोरा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. २०१४ मध्ये बाळू धानोरकर शिवसेनेच्या तिकिटावर जिंकले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा पराभव केला.
नांदेड दक्षिण मतदारसंघात २०१४ मध्ये विजयी झालेले शिवसेनेचे हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार झाल्यामुळे आता नांदेड दक्षिण या मतदारसंघात शिवसेनेने त्यांच्या पत्नी जयश्री यांना उमेदवारी दिली आहे.